#अबाऊट टर्न : कुतूहल 

File photo

 – हिमांशू 

ज्योतिषाला हात दाखवून परदेशगमनाचा योग आहे का, असं विचारणाऱ्यातले आम्ही नव्हे. “हल्ली सहज फिरायला म्हणून दरवर्षी देशाबाहेर जाणाऱ्या लोकांची संख्या खूपच वाढलीय. त्या तुलनेत टॅक्‍स भरणाऱ्यांची संख्या वाढत नाही’, असं मागे खुद्द पंतप्रधानांनीच आकडेवारीनिशी सांगितलं होतं. याबद्दल त्यांनी दुःखही व्यक्त केलं होतं. अर्थात, त्यांचं दुःख वाया गेलं आणि केवळ फिरण्यासाठीच नव्हे, तर चंबूगबाळं आवरून कायमस्वरूपी देश सोडून बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढली, हा भाग वेगळा. या मंडळींमध्ये करबुडव्यांबरोबरच कर्जबुडव्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्या तुलनेत आमच्यासारखी माणसं बरी! एलआयसीची पॉलिसी वगैरे घेऊन किती टॅक्‍स वाचू शकतो, यापलीकडे आमचे विचार जात नाहीत. शिवाय, देशातच आम्हाला खूप व्हरायटी आणि नमुने बघायला मिळत असल्यामुळं जगभर फिरायची फारशी हौसही नाही. पण अलीकडे एक देश पाहण्याची ऊर्मी दाटून येतेय. “अँटिग्वा’ नावाच्या या छोट्याशा देशाचं नावसुद्धा आपण बरोबर लिहिलंय की नाही, हे आम्हाला वारंवार तपासून पाहावं लागतं. पण देश बघावासा वाटतो खरा! सेंट जॉन या राजधानीच्या शहराची लोकसंख्याच अवघी 32 हजार आहे, अशा देशात जाण्यासाठी भारतातल्या मंडळींनी अचानक लाइन का लावलीय, हे कुतूहल आम्हाला हल्ली अस्वस्थ करू लागलंय.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या देशात ऑनलाइन जुगार कायदेशीर आहे म्हणे! पण असे अनेक देश आहेतच की! मेहुल चोक्‍सी या प्रसिद्ध भारतीयाला नुकतंच नागरिकत्व मिळाल्यामुळं हा देश पुन्हा चर्चेत आला. पण एकाच वर्षात तब्बल 28 भारतीय या देशाचं नागरिकत्व मिळवण्यासाठी रांगेत उभे असल्याचं ऐकून केवळ आम्हालाच नव्हे, तर अँटिग्वामधल्या विरोधी पक्षांनाही धक्का बसलाय. इतका की, तो सध्या तिथला राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषय बनलाय. कॅरिबियन बेटांमधल्या या देशाचं नागरिकत्व मिळवण्यासाठी हल्ली एवढी गर्दी का होतेय, याचं स्पष्टीकरण अँटिग्वाच्या पंतप्रधानांनी द्यावं, अशी तिथल्या विरोधकांची मागणी आहे. जानेवारी ते जूनदरम्यान नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱ्या सात भारतीयांचे अर्ज मंजूर झालेत. अँटिग्वाच्या राष्ट्रीय विकास निधीत विशिष्ट रकमेची गुंतवणूक केली की, तिथलं नागरिकत्व मिळतं. शिवाय सरकारमान्य रिअल इस्टेट किंवा अन्य कंपन्यांमध्ये गुंतवणूक करता येते. एकदा अँटिग्वाचा पासपोर्ट मिळाला की 132 देशांमध्ये व्हिसाविना फिरता येतं. नागरिकत्व मिळालेल्या सात भारतीयांनी त्या मोबदल्यात अँटिग्वामध्ये दोन लाख डॉलरची गुंतवणूक केलीय म्हणे! अर्थातच हे पैसे कुठून आणले हे (तिथं) सांगण्याची गरज नाही आणि (इथं) ते सगळ्यांना ठाऊक आहे. एकंदरीत जुगाराप्रमाणंच तिथं फिक्‍सिंगही कायदेशीर असावं, असं दिसतंय.

जगातले काही देश टॅक्‍स हेवन म्हणून लोकप्रिय आहेत, एवढं ऐकून होतो. पण अँटिग्वा सर्वच बाजूंनी हेवन आहे. म्हणूनच ही निसर्गरम्य भूमी एकदा बघायची तीव्र इच्छा झालीये. हप्ता देऊन गुन्हा पचवता येतो, हे इथंही पाहता येतं. पण आपापल्या देशातून लुटून आणलेल्या पैशांपैकी काही रक्कम इनव्हेस्ट केल्यास तहहयात संरक्षण मिळतं, ही बाब तरीही झेपेना राव! तिथले विरोधक मात्र इथल्यासारखेच वाटतात. सगळं माहीत असूनसुद्धा गर्दीचं कारण विचारतायत. यडे कुठले!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)