#अबाउट टर्न : ऍडमिन 

– हिमांशू 

जहाज बुडायला लागल्यावर उंदरांनी पटापट उड्या मारून पसार व्हावं, तशी एकेक मेंबरं ग्रुपमधून उड्या मारायला लागली आणि घाबरलेल्या मित्रानं आम्हाला फोन केला. भरपावसात दुचाकी चालवत असताना रस्त्याकडेला थांबून आम्ही रेनकोटात हात घालून फोन बाहेर काढला. ग्रुपमधून मेंबर लेफ्ट होत असल्याची वर्दी मित्रानं दिली. त्याचा घाबराघुबरा आवाज ऐकून धीर देण्याचा विचार मनात आला. पण फोन भिजू लागल्यामुळं, ऑफिसमध्ये पोहोचल्यावर फोन करण्याची हमी देऊन किक मारली. ऑफिसमध्ये गेल्यावर हात कोरडे करून शब्द पाळला. घाबरण्याचं कारण विचारल्यावर मित्र म्हणाला, चाळीसातले वीसच लोक राहिलेत आणि आता मीच (म्हणजे तो) डिफॉल्ट ऍडमिन बनलोच.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याची भीती निराधार वाटत असतानाच त्यानं भीतीचं खरं कारण सांगितलं. अफवा, खोट्या बातम्या आणि आक्षेपार्ह मजकूर याविरुद्ध सरकारनं व्हॉट्‌सऍपला दुसऱ्यांदा तंबी दिलीय. काही विपरीत घडलं तर कंपनीलाही जबाबदार धरलं जाईल, असं नोटिशीत म्हटलंय. कंपनीनं ही जबाबदारी ऍडमिनवर ढकललीय आणि ऍडमिनच लेफ्ट झाला तर डिफॉल्ट ऍडमिनला जबाबदार धरलं जाणार आहे. डिफॉल्ट ऍडमिनच्या फीचरलाही त्यामुळंच विरोध होतोय. भोपाळचा एक तरुण केवळ डिफॉल्ट ऍडमिन असल्यामुळं पाच महिन्यांपासून तुरुंगवास भोगतोय. आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा मूळ ऍडमिन मात्र पसार!

सांगलीतसुद्धा एका ऍडमिनवर कारवाई झाल्याचं मित्रानं सांगितलं. ईव्हीएमसंदर्भात काहीतरी पोस्ट त्यानं टाकली होती म्हणे! फोनवर बोलता-बोलता ऍडमिन ही किती जबाबदारीची पोस्ट आहे, असा विचार डोक्‍यात सुरू झाला. व्हॉट्‌सऍपचा ग्रुप असो किंवा राजकीय पक्ष असो, ऍडमिन महत्त्वाचाच! उगाच का राहुल गांधींनी कॉंग्रेसमधल्या वाचाळवीरांना इशारा दिलाय! आपण मोठी लढाई लढत आहोत आणि त्यामुळंच कुणी बेजबाबदार वक्तव्यं करू नका. केल्यास कारवाईला तयार राहा, असा दमच त्यांनी नेत्यांना भरलाय. खरंय! एकतर हातात सत्ता नाही. असती तर एखाद्‌-दुसरं वक्तव्य पचवता आलं असतं. पण आता सगळ्यांचंच लक्ष आपल्यावर असणार आणि उणीधुणी काढायला लोक टपलेले असणार, हे त्यांनी वेळीच ओळखलं. व्हॉट्‌सऍपचा ग्रुप असाच हॅंडल करायला पाहिजे आणि त्यासाठी ऍडमिन सक्षम पाहिजे. पूर्वी आमच्या डोक्‍यात असा एखादा आदर्श ग्रुप स्थापन करण्याची कल्पना आली होती. ऍडमिन आम्ही स्वतः झालो, तेव्हा उच्चपद भूषवल्याचा आनंद आयुष्यात पहिल्यांदा मिळाला. पण हळूहळू तिथंही माणसं खुस्पटं काढू लागली, तेव्हा आमच्या हातांनी तो ग्रुप आम्ही बंद केला. त्यावेळी कळलं, की बऱ्याच दिवसांनी मनमोकळी मतं मांडायला मिळणं हे जितकं चांगलं, तितकंच वाईट असतं. जबाबदारीचं भान राहिलं नाही तर मेंबर निसटून जातात. ऍडमिन अडकतो!

आमच्या ग्रुपमधून ऍडमिनसह मेंबर इतके पटापट कसे काय लेफ्ट झाले, याचं कारण मित्राला विचारलं, तेव्हा त्यानं या धावपळीला कारणीभूत ठरलेल्या पोस्टबद्दल सांगितलं. “व्हॉट्‌सऍपवर अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करणार, हीसुद्धा एक अफवाचआहे,’ असं कुणाचंतरी स्टेटमेन्ट ग्रुपवर शेअर झाल्याचं त्यानं सांगितलं. “कुणी केलं,’ असं विचारलं तेव्हा म्हणाला, “मीच!’.आम्ही कपाळावर हात मारून घेतला आणि फोन बंद करून डेटालाइन चालू केली. मित्र लेफ्ट झाला होता. डिफॉल्ट ऍडमिन आता आम्हीच होतो!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)