अबब… 18 हजारांचा एक “खड्डा’

File photo

प्रशासनाची उधळपट्टी? : “जेट पॅचर’च्या उपयुक्‍ततेवर प्रश्‍नचिन्ह

पिंपरी – महापालिका प्रशासन “पारदर्शी’ कारभार करीत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल 85 टक्‍के खड्‌डे बुजवले आहेत, असा दावा प्रशासनाने केला आहे. तरीही विरोधी पक्षाने “सेल्फी विथ खड्डा’ उपक्रम राबवून “पारदर्शी’ कारभाराचा बुरखा फाडला. त्यावर कहर म्हणून आता “जेट पॅचर’मशीनद्वारे “झटपट’ खड्डा बुजवण्याची यंत्रणा राबवली जात आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, या यंत्रणेद्वारे एक खड्डा बुजवण्यासाठी सरासरी तब्बल 18 हजार रुपयांचा खर्च येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी-चिंचवड शहरात रस्ते विकसित करण्यासाठी व डांबरीकरणासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये स्थापत्य विभागाकडून खर्च केले जातात. तरीही दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडून रस्त्यांची चाळण होते. रस्त्यावर खड्डे पडल्यास ठेकेदारांकडून दुरुस्ती करून घेणे किंवा त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने ठेकेदारांना वठणीवर आणायचे सोडून महापालिका तिजोरीतून हे खड्डे बुजविण्यासाठी 8 कोटी 40 लाख रुपयांची निविदा काढली. जेट पॅचर पोथॉल पॅचिंग मशिन हे नवीन तंत्रज्ञान वापरण्याबाबतची निविदा इ- प्रभागाकडून 23 ऑक्‍टोबर ते 20 नोव्हेंबर 2017 या कालावाधीत काढण्यात आली.

निविदा प्रक्रियेत पात्र ठरलेल्या मे. अंजनी लॉजिस्टिक या ठेकेदाराला 8 कोटी 32 लाख 41 हजार 772 रुपयांमध्ये हे खड्डे बुजवण्याचे कंत्राट देण्यात आले. प्रशासनाने या कामाची मुदत 36 महिने म्हणजे 3 वर्षे ठेवली आहे. मात्र, प्रत्यक्षात हा ठेकेदार फक्त पावसाळ्यातील 4 महिने खड्डे बुजवण्याचे काम करणार आहे. तीन महिन्यात सुमारे 2 कोटी 80 लाख रुपयांचा खर्च या कामावर होणार आहे. मात्र, 1 जूनपासून शहरात निदर्शनास आलेल्या 4 हजार 465 खड्ड्यांपैकी जेट पॅचर मशीनच्या सहाय्याने आजवर फक्‍त 458 खड्डे बुजविल्याची आकडेवारी स्थापत्य विभागाने दिली आहे.

पुन्हा एकदा नागपूर कनेक्‍शन

महापालिकेने ही निविदा प्रक्रिया राबवितानाच गोलमाल केली होती. त्यानंतर कोट्यवधी खर्चाच्या या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागला आहे. त्यात विशेष म्हणजे जेट पॅचर मशीनचे काम घेणारा मे. अंजनी लॉजिस्टिक हा ठेकेदार नागपूरचा आहे. आणखी वादाची बाब म्हणजे स्थापत्य विभागाचे ही निविदा असल्याने या मशीनव्दारे बीआरटीएस रस्त्यांवरील खड्डे बुजवले जात नसल्याचेही स्थापत्य विभागाने म्हटले आहे. केवळ डांबरी आणि सुसज्ज असलेल्या रस्त्यांवरील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यावश्‍यक खड्डे बुजवण्यासाठी जेट पॅचरचा उपयोग केला जाणार आहे. त्यातच ही यंत्रणा नागपूर येथील संस्थेद्वारे राबवली जात आहे. वास्तविक, आयुक्‍तांबाबत “नागपूर कनेक्‍शन’चा अनेकदा उल्लेख होतो. आता विकासकामांसह देखभाल दुरुस्तीच्या कामांतही “नागपूर कनेक्‍शन’चा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

महापालिकेच्या तिजोरीलाच “खड्डा’
स्थापत्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत बुजविलेल्या 458 खड्ड्यांचा एकूण आकार 5 हजार 484 चौ.मी. इतका आहे. तर, जेट पॅचर मशीनचे काम देताना ठेकेदाराला चार महिन्यात प्रत्येक प्रभागातील 1900 चौ.मी. आकाराचे खड्डे बुजवायचे आहे. त्यानुसार चार महिन्यात जास्तीत जास्त 15 हजार 200 चौ.मी. आकाराचे खड्डे बुजविले जाणार आहेत. हे प्रमाण बघता चार महिन्यात जवळपास 1500 खड्डे या मशीनच्या सहाय्याने बुजवले जाऊ शकतात. त्या प्रमाणे चार महिन्यात 2 कोटी 80 लाखांचा खर्च आणि 1500 खड्डे बुजवल्यास प्रति खड्डा 18 हजार रुपये इतका खर्च येत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे खड्डा बुजवण्याच्या नावाखाली पालिका तिजोरीला खड्डा पाडण्याचा डाव पालिका अधिकारी व ठेकेदारांकडून संगनमताने सुरू आहे का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)