अपघात कसे टळणार? (अग्रलेख) 

संग्रहित छायाचित्र

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर आणि रायगड जिल्ह्यातील पोलादपूर यांना जोडणाऱ्या आंबेनळी घाटात खोल दरीत बस कोसळून झालेल्या अपघातात 33 जणांचा मृत्यू होणे खरोखरच दुर्देवी आहे. शनिवार,रविवारच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी वर्षा सहलीचा घाट घातलेल्या दापोली कृषि विद्यापीठातील कर्मचाऱ्यांवर आंबेनळी घाटातच काळाने घाला घातला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. देशाच्या कानाकोपऱ्यात कोठे ना कोठे असे अपघात घडतच असल्याने केवळ एक बातमी म्हणून त्याकडे पहाण्यापेक्षा असे अपघात कसे टळतील आणि कमी कसे होतील याचा अधिक विचार होण्याची गरज आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी दंडाची रक्कम वाढवण्यात यावी आणि कठोर शिक्षेची तरतूद असावी, लहान मुलांनी वाहन चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे यासारख्या गुन्ह्यांकरीत गंभीर शिक्षा असावी अशी अपेक्षा काही स्वयंसेवी संस्थांनीही व्यक्त केली आहे. एकूणच रस्ते अपघातांबाबत समाजमन असे तीव्र असताना सरकारला त्याची दखल घेऊन ठोस उपाय योजावे लागणार आहेत. 

तसेच अपघातानंतरचे जे आपत्ती व्यवस्थापन असते ते अधिक कार्यक्षम कसे होईल, याकडेही आता प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. आंबेनळी घाटात झालेल्या या अपघाताच्या कारणाचा शोध सुरु आहे. प्रचंड पावसामुळे रस्त्याच्या कडेला झालेल्या चिखलात घसरल्याने बस दरीत कोसळली अशी माहिती या अपघातात सुदैवाने बचावलेल्या प्रकाश सावंत यांनी दिली आहे. खरेतर आंबेनळी घाट अवघड आणि वळणावळणाचा असला तरी ज्या ठिकाणी अपघात झाला ते ठिकाण अपघातप्रवण नव्हते. तरीही त्याठिकाणी अपघात झाला हे विशेष. बसमध्ये चेष्टामस्करी सुरु असताना चालकाने सहज मागे वळून पाहिले आणि त्याचे बसवरील नियंत्रण सुटून बस चिखलात घसरुन दरीत कोसळली असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

म्हणजेच कोणत्याही अपघाताची जी अनेक कारणे असू शकतात त्यापैकी मानवी चुका हे एक कारण प्रमुख असते हे यानिमित्ताने सिध्द झाले आहे. कोणतेही यंत्र सुस्थितीत असेल तर ते व्यवस्थितच चालते. यंत्र चालवणाऱ्याच्या दोषामुळेच अपघात घडतात हा नियमच आहे.देशाचे रस्ते वाहतूक मंत्रालय आणि राज्यातील वाहतूक खाते सातत्याने सुरक्षित वाहतुकीसाठी प्रबोधनाचे कार्यक्रम राबवत असले तरीही अपघातांचे प्रमाण कमी होत नाही. म्हणूनच हे प्रमाण कमी करण्यासाठी आता अधिक गंभीर प्रयत्न करण्याची गरज आहे. घाटरस्त्यांवर सुरक्षित वाहतुकीसाठी कठडे किंवा रेलिंग उभारणे आवश्‍यक असते. पण आंबेनळी घाटात अशा सुरक्षा कठड्यांचा अभाव असल्याचे या दुर्घटनेच्या निमित्ताने समोर आले आहे.

घाटातील अपघात असो किंवा सरळसोट महामार्गावरील अपघात, त्याच्या कारणांचा शोध घेउन ती कारणे मुळापासून नष्ट करण्यासाठी आता जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहेत. रस्त्यांवरील खड्डे हे अपघाताचे एक कारण असते. खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक गंभीर अपघात होतात. देशभरात खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातातील मृत्यूंवर सर्वोच्च न्यायालयानेही काळजी व्यक्त केली आहे. “खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दहशतवादी हल्ल्यापेक्षा जास्त आहे,’ अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात सरकारला फटकारले आहे आणि रस्ते सुरक्षेशी संबंधित समितीला यामध्ये लक्ष घालण्याचा आदेश दिला आहे. दुसरीकडे, देशभरामध्ये रस्त्यांवर होणारे वाहनांचे अपघात आणि त्यामध्ये होणारा निष्पाप नागरिकांचा मृत्यू ही गंभीर समस्या आहे.

“अपघात आणि मृत्यूंचे हे सत्र थांबवा, त्यासाठी रस्ते सुरक्षा अभियान राबवा आणि कायदे अधिक कडक करा’, अशी मागणी करणारे पत्र देशभरातील प्रतिष्ठित नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे हेही महत्वाचे आहे. रस्ते अपघातांमध्ये होणारे मृत्यू ही गंभीर घटना असून देशभर रस्ते सुरक्षा अभियान राबवणे ही केंद्र शासनाने आपली प्राथमिक जबाबदारी समजून त्याप्रमाणे काम करावे, अशी अपेक्षा या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे आणि सरकारला त्याची दखल घ्यावीच लागणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्यांच्या विकासामध्ये वेगवान काम केले आहे. मात्र रस्त्यांवरील सुरक्षेबाबत आपल्या हातून ठोस काही घडले नसल्याची खंत त्यांनीही वेळोवेळी व्यक्त केली आहे. रस्त्यांवरील अपघातांचे आणि त्यामध्ये होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण लक्षात घेऊन गडकरी यांनी मोटार वाहन कायदा दुरुस्ती विधेयक संमत करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी आता केली जात आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी दंडाची रक्कम वाढवण्यात यावी आणि कठोर शिक्षेची तरतूद असावी, लहान मुलांनी वाहन चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे यासारख्या गुन्ह्यांकरीत गंभीर शिक्षा असावी अशी अपेक्षा काही स्वयंसेवी संस्थांनीही व्यक्त केली आहे. एकूणच रस्ते अपघातांबाबत समाजमन असे तीव्र असताना सरकारला त्याची दखल घेऊन ठोस उपाय योजावे लागणार आहेत. अपघातानंतरच्या व्यवस्थापनामध्येही प्रचंड सुधारणा होण्यास वाव आहे. आंबेनळी अपघातातील मृतदेह बाहेर काढण्याचे काम केवळ अंधार आणि पाऊस यामुळे थांबवावे लागले. जरी एनडीआरएफचे पथक अपघातस्थळी वेळेत पोहोचले असले, तरी या अपघातात कोणीही वाचण्याची शक्‍यता नसल्याने, केवळ मृतदेह बाहेर काढणे एवढेच काम होते.

पण अनेकवेळा अपघातात लोक अडकून पडलेले असतात. त्यांच्यापर्यंत वेळेत मदत पोहोचली तरच जीव वाचू शकतो. अपघात किंवा दुर्घटनेनंतरचे व्यवस्थापन जेवढे कार्यक्षम आणि वेगवान असेल तेवढीच अपघाताची तीव्रता कमी होऊ शकते. म्हणूनच परदेशातील अशा यंत्रणांचा अभ्यास करुन त्या भारतात आणणे शक्‍य आहे का, याचाही विचार आता करावा लागणार आहे. अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि त्याचबरोबर अपघातोत्तर व्यवस्थापन कार्यक्षम करण्याचा धडा आंबेनळी अपघाताने निश्‍चितच दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)