अपंगत्वावर मात करत जयंतचे यूपीएससीत यश

पंचाहत्तर टक्के अंधत्व असूनही 923 वा रॅंक : बाबा आमटेंच्या गीतातून मिळाली प्रेरणा
पुणे – ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या गीतावरून प्रेरणा घेत बीडचा जयंत मंकले या 25 वर्षीय दिव्यांग उमेदवाराने यूपीएससी परीक्षेत यश संपादन केले आहे. जयंत हा 75 टक्‍के अंध असूनही त्याचा यूपीएससी परीक्षेच्या निकालात 923 वा रॅंक मिळाला आहे. जिद्द, चिकाटी आणि कष्टाची तयारी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्‍य नाही, हेच जयंतने साध्य करून दाखविले.

जयंतने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या संगमनेर येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. पदवी शिक्षणानंतर 2014 साली त्याला “रेटिना पेगमिंटो’ हा डोळ्याचा आजार झाल्याने त्याला 75 टक्के अंधत्व आले. या आजारामुळे दृष्टी हळूहळू कमी होत आहे. या आजारावर अद्यापर्यंत कोणतेही औषधोपचार नाहीत. तरी जयंत खचला नाही. या अचानक आलेल्या दिव्यांगामुळे त्याला भोसरी येथील कंपनीतील नोकरी सोडावी लागली. त्यानंतर त्याने पुण्यातून युपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला.

वडील शासकीय सेवेत चतुर्थ कर्मचारी होते. त्यांचे 2003 सालीच निधन झाले होते आणि आई गृहिणी त्यामुळे पैशांची तशी चणचणच होती. वडीलांची केवळ सात हजार रुपये पेंशन मिळत होती. अभियांत्रिकी शिक्षणासाठी बॅंकेकडून शैक्षणिक कर्ज घेतले होते. त्याचे पैसे अजूनही देत आहे. आई काही घरगुती पदार्थ बनवून विकू लागली. जयंतच्या दोन बहिणीही त्याच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्याच्या युपीएससी करण्याच्या निर्णयाला या तीनही रणरागिणींनी पाठिंबा दिला. त्याला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही याची त्यांनी काळजी घेतली.

जयंतने युपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला परंतु ही परीक्षा पास होणे सोपे नव्हते. मुळातच ही परिक्षा अत्यंत कठीण आणि त्यातही 75 टक्के अंधत्व असल्यामुळे जयंतचा प्रवास अत्यंत खडतर होता. जयंतने जास्तीत जास्त ऐकण्यावर भर दिला. अंध विद्यार्थ्यांसाठी स्क्रीन रीडर ऍप आहे. परंतु आर्थिकदृष्ट्या परवाडणारे नव्हते. त्यामुळे रेडिओ असो, किंवा टिव्ही जास्तीत जास्त अभ्यास या माध्यमातून त्याने केला. कमीत कमी नोट्‌समध्ये जास्तीत जास्त अभ्यास करायचा असा निश्‍चय त्याने केला होता. काही महत्त्वाच्या अभ्यासाचे मोबाईलमध्ये फोटो तो कोणाकडून तरी काढून घेत असे व त्यानंतर ते झूम करून तो ते वाचत असे. यात त्याचा बराचसा वेळ जात असे. दिवसातील 11 ते 12 तास त्याने अभ्यास केला. पैशांची अडचण असल्याने एखादा क्‍लास लावणे शक्‍य नव्हते त्यामुळे त्याने घरीच अभ्यास केला. त्याला मनोहर भोळे आणि प्रवीण चव्हाण यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्याच्या घरच्यांच्या पाठिंब्यामुळे तो हे यश संपादन करू शकला आहे.

यश मिळवायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. मला 75 टक्के अंधत्व असल्याने मला अभ्यास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु खचून न जाता जिद्दीने मी अभ्यास केला. बाबा आमटे यांची कविता माझ्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी खचून न जाता जिद्दीने त्यांचा सामना करायला हवा. मग यश तुमचेच आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना बाबा आमटे यांची कविता प्रेरणेसाठी पुरेसे आहे. “श्रृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही’. – जयंत मंकले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
25 :thumbsup:
24 :heart:
11 :joy:
0 :heart_eyes:
13 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)