…अन्‌ डॉक्‍टरांनी घडवले माणुसकीचे दर्शन

– अंध विद्यार्थ्याच्या खांद्यावर मोफत शस्त्रक्रिया

पिंपरी – घरात कमवता पुरुष नाही…, आई आणि तीन बहिणींचे कुटुंब…, अशातच अंध असलेल्या अक्षय पाटील याचा खेळताना अपघात होवून उजवा खांदा निकामी झाला. डोळ्यापुढे अंधार असताना जीवनही अंधारात सापडलेल्या अक्षयला एका डॉक्‍टरच्या रुपात माणुसकीचे दर्शन घडले. अक्षयची परिस्थिती पाहून त्याच्यावर पुर्णतः मोफत उपचार केले. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट होत असताना खासगी डॉक्‍टरनेच दाखवलेल्या या माणुसकीची चर्चा शहरात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अक्षय पाटील हा अंध विद्यार्थी आहे. त्याचे वडील हयात नाहीत. त्याच्या घरी कमावते असे कोणीच नाही. आई व तीन बहिणी असे कुटुंब असलेल्या अक्षयच्या घराची अत्यंत बिकट परिस्थिती आहे. तो चिंचवडमधील अंध शाळेत शिकताना अर्थाजनासाठी कामही करतो. हात आणि तोंडाची मिळवणी करण्यासाठी कायमचा संघर्ष नशिबाच्या वाट्याला आलेल्या अक्षयला मोठा धक्का बसला. क्रिकेट खेळत असताना तो त्याच्या उजव्या खांद्यावर पडला. त्यामुळे त्याचा उजवा खांदा अक्षरशः निकामी झाला.

उपचारासाठी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सुमारे दीड ते दोन लाखांचा खर्च सांगण्यात आला. मात्र, पैसेच नसल्याने करायचे काय, असा प्रश्‍न त्याच्या डोळ्यासमोर उभा ठाकला. या रुग्णालयातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अपूर्व पटवर्धन यांना अक्षयच्या परिस्थितीची माहिती मिळाली. त्यांनी मोफत शस्त्रक्रियेबरोबरच त्यासाठी आवश्‍यक साहित्य व औषधे याचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली. या रुग्णालयातच त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. अपूर्व पटवर्धन यांच्यासह डॉ. अतुल गांधी, डॉ. सलोनी कुलकर्णी, गौतम त्र्यंबके यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. आता अक्षयची प्रकृती स्थिर आहे. डॉक्‍टरांच्या या औदर्याची परिसरात चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)