अन्यथा रुग्णालयास टाळे ठोकू

अनागोंदी कारभारामुळे ग्रामीण रुग्णालय गॅसवर

वाई ग्रामीण रुग्णालयात तालुक्‍याच्या ग्रामीण दुर्गम भागातून येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे रुग्णांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी व अनेक रिक्त पदे आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून समस्या न सोडविल्यास रुग्णालयास टाळे ठोकू असा इशारा संतप्त सोनगिरवाडीकरांनी दिला आहे.

वाई  – वाई ग्रामीण रुग्णालयाला कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी, दोन द्वितीय श्रेणीचे वैद्यकीय अधिकारी, दोन क्‍लार्क, लॅब टेक्‍निशीयन, नर्सेस, सफाई कामगार इत्यादी अनेक पदे रिक्त असल्याने ग्रामीण रुग्णालयाची अवस्था दयनीय झाली असून ग्रामीण रुग्णालयाची सर्व सोयीनियुक्त असतानासुद्धा तालुक्‍यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय वैद्यकीय सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना नाइलाजास्तव खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागल्याने नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

यामुळे अनेक वेळा नागरिकांच्या रोषाला कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बरेच दिवस वैद्यकीय आधिकाऱ्याविना गैरसोयीत असलेल्या वाई ग्रामीण रुग्णालयाविषयी नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. तरी जिल्हा प्रशासनाने तालुक्‍याच्या मुख्य ठिकाणी असणाऱ्या रुग्णालयाकडे गांभीर्याने लक्ष देवून सर्व पदे भरण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच ग्रामीण रुग्णालयाला जिल्हा उपरुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी होत आहे.

रुग्णालयात दररोज वाई शहरातून व तालुक्‍यातून तीनशे ते चारशे बाह्य रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारीच नसल्याने रुग्णांची ससेहोलपट होत आहे. तसेच ऐन वेळी अपघात किंवा दुर्घटना घडल्यास पोस्टमार्टम करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी नसल्याने मृत्यूनंतरही प्रेताची हेळसांड होताना दिसत आहे.
दरम्यान सोमवार 15 एप्रिल रोजी जनार्दन राजाराम संकपाळ यांनी कृष्णानदीच्या डोहात आत्महत्या केली. त्यांच्या नातेवाईकांनी पोस्टमार्टमसाठी ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्याविना चार तास ताटकळत थांबवे लागले. त्यामुळे वाईकरांनी संताप व्यक्त केला. रुग्णालयात गरजेच्या चाळीस टक्केच कर्मचारी आहेत. साठ टक्के पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. तरी शासनाने व जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्वरित लक्ष घालून रिक्त पदे भरावीत व रुग्णालयात होणाऱ्या पेशंटची हेळसांड थांबवावी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.