…अन्यथा भाजपने परिणामाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत माळी समाजाला प्रतिनिधित्व मिळाले असले, तरी देखील महत्त्वाची पदे नसल्यानेच अनेक वर्षांपासून समाजाची अनेक कामे व प्रश्‍न प्रलंबित राहिले आहेत. त्यातच नितीन काळजे यांना महापौरपदी संधी दिल्याने हा समाज नाराज आहे. त्यामुळे मूळ ओबीसी उमेदवाराला आता महापौरपदी संधी द्यावी. अन्यथा भाजपने आगामी निवडणुकांमध्ये परिणामाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा माळी समाजाच्या वतीने शनिवारी (दि. 28) पत्रकार परिषदेत देण्यात आला.

माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे यांनी समाजाची बाजू मांडली. यावेळी नगरसेविका नम्रता लोंढे, स्वीनल म्हेत्रे, अश्‍विनी जगताप, माजी नगरसेवक अजय सायकर, सुनील लोखंडे, प्रभाग स्वीकृत सदस्य सागर हिंगणे, अजित बुर्डे, पिंपरी-चिंचवड माळी महासंघाचे आनंदा कुदळे, काळूराम गाकवाड, ईश्‍वर कुदळे आदी उपस्थित होते.
यावेळी समाजाच्या प्रलंबित मागण्या या पत्रकार परिषदेत मांडण्यात आल्या. शहराच्या वैभवात भर घालणारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचे उद्‌घाटन झाले आहे. मात्र, या वास्तुमध्ये शैक्षणिक कार्याऐवजी महापालिकेच्या अन्य विभागांचे कार्यालय स्थलांतरित करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, अनेक संघटनांचा याला विरोध झाल्याने हे स्थलांतर रखडले आहे. याशिवाय आद्य कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांचे कामगार चळवळीतील योगदान लक्षात घेता, उद्योगनगरीत त्यांचा पुर्णाकृती पुतळा व भव्य स्मारक उभारण्याची मागणी महापालिकेकडे प्रलंबित आहे. माळी समाजाच्या या कामगार नेत्याची महापालिकेने योग्य दखल घेतलेली नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विधानसभा व महापालिका निवडणुकीत माळी समाज महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मागे ठामपणे उभा राहिला. त्यामुळे भाजपला चांगले यश मिळविता आले. मात्र, कुणबी समाजाच्या नितीन काळजे यांना महापौरपदी संधी दिल्याने समाजात विरोधाचे व नाराजीचे वातावरण आहे. मात्र, काळजे यांच्या राजीनाम्यामुळे माळी समाजाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. महापालिकेतील कोणत्याही एका माळी समाजाच्या नगरसेवकाला महापौरपदी संधी देण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

महत्त्वाच्या पदावरुन समाजाला डावलले!
शहरातील प्रत्येक गावात माळी समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. मात्र, महापालिकेतील माळी समाजाचे प्रतिनिधीत्व पुरेसे नसल्याने, दबाव निर्माण करता येत नसल्याने महापालिकेतील महत्त्वाच्या पदांसाठी या समाजातील नगरसेवकांचा विचार होत नाही. काहीसे गाफील राहिल्यानेच यंदा या समाजाला मिळणारे स्थायी समितीचे अध्यक्षपद थोडक्‍यात हुकले. मात्र आता पुन्हा एकदा महापौरांच्या रूपाने या समाजाला संधी देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे भाजपने माळी समाजातील नगरसेवकाला महापौरपदी संधी न दिल्यास आगामी निवडणुकांमध्ये माळी समाजाला संधी न दिल्यास आगामी निवडणुकांमध्ये हा समाज आपली ताकद नक्‍कीच दाखवून देईल, असा इशारा या पत्रकार परिषदेत देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)