श्रीगोंदा | अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या प्रेयसीचा पती विशाल सुर्वे याला जीवे ठार मारल्याप्रकरणी खर्डा (ता.जामखेड) येथील एकाला श्रीगोंदा येथील जिल्हा व अति. सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी जन्मठेप व तेरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. कृष्णा संजय सुर्वे (वय १९, रा.खर्डा शिवार, ता.जामखेड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
मयत विशाल याच्या पत्नीचे आरोपीसोबत अनैतिक संबंध होते. ही बाब मयताच्या लक्षात आली. त्याने त्याच्या पत्नीला व आरोपीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मयत विशाल हा प्रेम संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याचे लक्षात आल्यानंतर मयताकडून होत असलेला विरोध व अडथळा दूर करण्याच्या हेतूने आरोपीने दि.१३ मे २०२२ रोजी मध्यरात्री मयत विशाल याचा निर्घृण खून केला.
मयताचा भाऊ सुशांत याने जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्याद दिल्यानंतर जामखेड पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास करण्यात आला. तपासा दरम्यान मयताच्या पत्नीचे आरोपीसोबत प्रेम संबंध असल्याचे निष्पन्न झाले होते. आरोपी व मयताची पत्नी यांच्या दरम्यान असलेल्या प्रेम संबंधाला मयत हरकत अडथळा करत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे आरोपीने मयताचा अडथळा दूर करण्याच्या दृष्टीने त्याचा खून केला, असेही निष्पन्न झाले.
सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण २१ साक्षीदार तपासण्यात आले. त्यातील काही साक्षीदार फुटीर झाले. परंतु फिर्यादी मयताचा भाऊ सुशांत, पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, पंच सुरेश पवार, प्रकाश गोलेकर, गोरख शिकारे, सुरेश हजारे, पवन सोनवणे, श्रीराम कुलकर्णी, हनुमंत औटी, योगेश वाळुंजकर, डॉ. संजय वाघ, साक्षीदार राजेंद्र भुमकर, तपास अधिकारी तत्कालीन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण, परिस्थितीजन्य व ग्राह्य धरण्यात आल्या.
सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या साक्षीदारांनी दिलेले पुरावे, दाखल कागदपत्रे आणि परिस्थितीजन्य पुरावे हे आरोपीविरुद्ध गुन्हा शाबित करण्याकामी सबळ व पुरेशी असल्याने तसेच आरोपीने केलेला खून निर्घृण स्वरूपाचा असल्याने आरोपी कृष्णा संजय सुर्वे यास मयत विशाल सुर्वे याला जीवे ठार मारल्याप्रकरणी व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी श्रीगोंदा येथील जिल्हा व अति सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ व २०१ नुसार दोषी धरून आरोपीला जन्मठेप तसेच १३ रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षास पैरवी पो.कॉ.सचिन पिरगळ, कर्मचारी दत्तात्रय शिरसाठ, पो.कॉ नामदेव रोहाकले, मपोकॉ आशा खामकर, सुजाता गायकवाड व अॅड. सुमित पाटील यांनी मदत केली.