अनवाणी आणि अंबारी

  कथाबोध

डॉ. न. म. जोशी

राजा भोज यांच्या काळातली गोष्ट आहे. भोज राजांच्या पदरी एक राजकवी होते. एकदा हे राजकवी रस्त्यानं चालले होते. ऊन मी म्हणत होतं. सगळीकडे उन्हाच्या झळा होत्या. एक भिकारीण त्या भर उन्हातही रस्त्याने भीक मागत चालली होती. ती अनवाणी होती. तिचे पाय पोळत होते. तरीही ती दीनवाणेपणानं पोटासाठी भीक मागत होती.
राजकवी अत्यंत सहृदय होते. त्यांना त्या म्हाताऱ्या भिकारणीचं दैन्य पाहावलं नाही त्यांनी तिला द्रव्य तर दिलंच पण स्वतःच्या पायातील पायताण (चपला) काढून तिला दिल्या.
“बाई, या चपला घाला. किती पाय पोळताहेत तुमचे,’ राजकवी म्हणाले.
भिकारणीनं तोंड भरून आशीर्वाद दिला…
“तुझं कल्याण हुईल रे बाबा; म्हातारीचं दुःख जाणलंस.’ म्हातारी म्हणाली.
आता राजकवी अनवाणी चालत होते. त्यांचेही पाय पोळत होते. पण झपाझपा पावलं टाकीत ते चालले होते.
एवढ्यात त्या रस्त्याने मागून एक हत्ती येत होता. हत्तीच्या माहुतानं पाहिलं… एक माणूस… चांगला दिसणारा. अनवाणी चालतो… हा माहूत हत्तीला नगरफेरीसाठी घेऊन चालला होता. हत्तीवर अंबारी होती. पण माहूत चालत होता.
माहुतानं राजकवीला थांबवलं आणि विचारलं..
“आपण अनवाणी का चालता आहात? आपली पादत्राणं कुठं आहेत?’
“त्या भिकारणीला देऊन टाकली,’ राजकवी म्हणाले.
“भिकारणीला पादत्राणं देऊन आपण अनवाणी चालताय?’
“माझ्यापेक्षा तिला पादत्राणांची गरज अधिक होती,’ राजकवी म्हणाले.
माहुतानं राजकवींना प्रणाम केला आणि त्यानं त्यांना हत्तीच्या अंबारीत बसवलं. “”मी तुम्हाला तुमच्या घरी पोचवतो तो म्हणाला.
एवढ्यात राजा भोज रथातून नगरप्रदक्षिणेसाटी चालला होता. राजाच्या मंत्र्यांनी पाहिलं… ते पुटपुटले…
“राजा रथात आणि राजकवी अंबारीत? अहो आश्‍चर्यम्‌ राजाला माहुतानं सर्व हकिगत नम्रपणे सांगितली. राजा रागावला तर नाहीच पण त्यानं राजकवींना अभिवादन केलं. त्यांच्या उदारतेनं राजाही थक्क झाला. अनवाणी राजकवीला मानाची अंबारी मिळाली.

   कथाबोध

संवेदनशीलता हा माणुसकीचा सर्वात मोठा आधार आहे. माणूस संवेदनशील असेल तरच त्याला माणुसकीचा गहिवर येतो आणि दुसऱ्याचे दुःख समजते. आपल्यापेक्षा अधिक गरजवंत कोण आहे याचा शोध खरा माणूस घेत असतो. कवी हा संवेदनशील असतो.

त्याचं मन टिपकागदासारखं असतं. तो पंचेंद्रियांच्या अनुभवातून सुख-दुःखाच्या संवेदना टिपत असतो. त्याचे वर्तनही त्याप्रमाणे असते. राजा असो, कवी असो. त्याचं मन संवेदनांनी फुलणारं आणि जळणारंही हवं सगळ्यांनाच राजकवी सारखी अंबारी मिळेल असं नाही. पण सगळ्यांना निदान अनवाणी पायाचं दुःख आणि त्यांचो होरळपळ जाणली तरी पाहिजे. समाजातील दुःख दूर होण्यासाठी तेवढीही गोष्ट पुरेशी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)