अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजी विक्रेत्यांना रेषा आखून देणार

संग्राम जगताप : मनपाचे अधिकारी देत आहेत भाजी विक्रेत्यांना त्रास

नगर -येथील प्रोफेसर चौकातील भाजी विक्रेत्यांना गेल्या आठवड्यात महापालिकेने हटवले होते. त्यानंतर कॉंग्रेस व शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विक्रेत्यांसह महापालिका आयुक्तांशी चर्चा केली होती. तरीही विक्रेत्यांनी बसू न नये यासाठी महापालिकेचे अधिकारी त्रास देत आहेत

त्यामुळे अखेर विक्रेत्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या दरबारात आपली कैफीयत मांडत संरक्षण देण्याची मागणी केली. बुधवारी सकाळी आपण स्वतः महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजी विक्रेत्यांना रेषा आखून त्यांना व्यवस्थित जागेवर बसवण्याची व्यवस्था करू, अशी ग्वाही आमदार जगताप यांनी दिली. 

आज प्रोफेसर चौकातील एका दुकानदाराचे व विक्रेत्याचे भांडण झाले. याचे निमित्त करून महापालिकेने सर्वच विक्रेत्यांना हटवले. तब्बल चार दिवस विक्रीसाठी आणलेली भाजी विक्रेत्यांना तशीच परत न्यावी लागली. त्यानंतर कॉंग्रेस व शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विक्रेत्यांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. याबाबत आयुक्तांशी चर्चाही केली. त्यानंतर आता महापालिका तुम्हाला हटवणार नाही, अशी ग्वाही देण्यात आली.

परंतु चौकात बसू नका, नाही तर भाजीपाला जप्त करण्याबाबत विक्रेत्यांच्या मागे महापालिकेचा रोजच ससेमिरा सूरू आहे. त्यामुळे वैतागलेल्या विक्रेत्यांनी सोमवारी दुपारी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे पदाधिकारी अमित खामकर यांच्या माध्यमातून 20 भाजी विक्रेत्यांनी आमदार जगताप यांची भेट घेतली. यावेळी आमदार स्वतः विक्रेत्यांना रेषा आखून देणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.