अधिकाऱ्यांचे घर मेणाचे अन्‌ कर्मचाऱ्यांचे …

एसटीच्या कनिष्ठ कर्मचारी कॉलनीला गैरसोयींचा विळखा

दीपक देशमुख
सातारा, दि. 7 – एसटी महामंडळाची सेवा बजावताना घरापासून कित्येक दिवस दूर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्या कुुंटुबास किमान चांगल्या निवाऱ्याची अपेक्षा असते. मात्र, कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यांच्या कुटुंबांसाठी असलेल्या कॉलनीला अनेक गैरसोयींचा विळखा पडलेला आहे. एसटी प्रशासन वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगल्या सुविधा देत असताना कनिष्ठ कर्मचाऱ्यांना मात्र नेहमीच आखडता हात घेत आहे. परिणामी या कर्मचाऱ्यांच्या कुटुुबियांना पाणी टंचाईसह अनेक गैरसुविधांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचे घर मेणाचे अन्‌ कर्मचाऱ्यांचे घर… अशी भावना येथील कनिष्ठ कर्मचाऱ्यांची झाली आहे.
सातारा येथील एसटी कामगार वसाहतील 48 कुटुंबे राहत आहेत. त्यांच्यासाठी 4 पाण्याच्या टाक्‍यांची सोय करण्यात आलेली आहे. परंतु, सध्या या पाण्याच्या टाक्‍यांना गळती लागली आहे. यामुळे सकाळी मोटरच्या साह्याने पाणी चढवून सर्व टाक्‍या भरल्या तरी दुपारी बारा वाजायच्या आत सर्व पाणी वाहून जात असून टाक्‍या रिकाम्या होत आहेत. यामुळे पाण्याची नासाडी होत आहेच शिवाय ऐन उन्हाळ्यात येथील रहिवाशांना पाणी टंचाईचा सामनाही करावा लागत आहे. घरातील पुरुष मंडळी दिवसभर ड्युटीवर असल्याने येथील महिलांना पाण्याची व्यवस्था कशी करायची असा यक्ष प्रश्‍न समोर उभा राहिला आहे.
त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी अनेक दिवसांपासून घरांची डागडुजी करण्याची मागणी केली होती. त्याकडेही निधीचे कारण सांगून दुर्लक्ष करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या घरांच्या भिंतीचे कित्येक दिवसांपासून पोपडे उडाले आहेत. त्यासाठी निधीची वानवा आहे पण अधिकाऱ्यांच्या घरांची मात्र रंगरंगोटी करायला प्रशासनाकडे मुबलक पैसा दिसतोय. यामुळे कर्मचाऱ्यांबाबत असा दुजाभाव होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. याबाबत एसटी प्रशासनाला अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत. तसेच विविध पक्ष व संघटना यांनीही याबाबत निवेदने देवून एसटी कर्मचाऱ्यांच्या गैरसोयी प्रशासनापुढे मांडल्या होत्या. परंतु, एसटी प्रशासन अद्यापही ढीम्म आहे.

कॉलनी परिसरात अस्वचछता
एसटी कॉलनीचा परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असल्याने येथील कुटुंबियांचा आरोग्याचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. सध्या शाळांना सुट्ट्या लागल्या असल्याने लहान मुले कॉलनीतील परिसरात खेळत-बागडत असतात. त्या दृष्टीने परिसराची निगा राखणे गरजेचे आहे. याकडेही एसटी प्रशासनाचा कानाडोळा होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.