शॉर्ट फिल्म कॉर्नर : अदर्स (Others)

अदर्स या लघुपटाची सुरुवात सिग्नलवर पैसे मागत असलेल्या तृतीयपंथीयांपासून होते. पैसे गोळा करत असलेल्या तृतीयपंथीयांपैकी एकीला अचानक ‘कॉल’ येतो. या कॉलनंतर हे सर्व तृतीयपंथ मिळून एका हॉस्पिटलकडे रवाना होतात. त्या रुग्णालयामध्ये एका स्त्रीच्या पोटी तृतीयपंथी बाळाने जन्म घेतलेला असतो. समाजाच्या चालीरीतींप्रमाणे त्या नवजात तृतीयपंथी बाळाला तृतीयपंथीयांकडे सोपविण्यासाठी कुटुंबियांकडून बळजबरी केली जात असते. बाळाला घेण्यासाठी पुढे सरसावत शीला नावाची तृतीयपंथी म्हणते, “ज्याला देवानेच आपलेसे केले नाही त्याला हा समाज काय आपले मानणार? ते बाळ आमच्याकडे देऊन टाक” हे ऐकताच त्या बाळाची आई हृदयावर दगड ठेऊन साश्रू नयनांनी आपले बाळ तृतीयपंथीयांकडे सोपवते. बाळ हाती घेऊन ते तृतीयपंथी जल्लोष करायला सुरुवात करतात.

तेवढ्यात त्याठिकाणी एक इंस्पेक्‍टर येते. व त्यांना आवाज कमी करा नाहीतर येथून सर्वांना बाहेर काढेल, असा दम देते. यावर शीला म्हणते, तुम्ही काय बाहेर काढणार? आम्हाला तुम्ही आतच कधी येऊ दिले नाही. त्या बाळाला घेऊन तृतीयपंथी निघाल्यावर ती इंस्पेक्‍टर त्यांना थांबवते आणि बाळाला कोठे घेऊन जात आहे, असा जाब विचारते. शीला म्हणते, जिथे या बाळाला कोणी विचारणार नाही कि तू मुलगा आहेस कि मुलगी अशा ठिकाणी घेऊन जात आहोत. यावर ती इंस्पेक्‍टर म्हणते, मला तर कधी कोणी नाही विचारले कि मी मुलगा आहे का मुलगी? हे ऐकताच सर्व तृतीयपंथी एकमेकींकडे पाहतात. ती पुढे म्हणते, मी तुमच्यासारखीच सब-इंस्पेक्‍टर रितिका आहे. एवढ्यात एक नर्स जन्माच्या माहितीचा फॉर्म भरण्यास सांगते. तो फॉर्म ती इंस्पेक्‍टर घेते. आणि त्या फॉर्ममधील इतर (Other)चा पर्याय दाखवत म्हणते, आता या बाळालाही कोणी विचाणार नाही कि मुलगा का मुलगी? हे ऐकून शीला तिच्या बाळाला परत करते. आणि त्या सर्व तेथून जातात.

सब-इंस्पेक्‍टर रितिका ही 26 वर्षांची असून तीन न्यायालयात खटले लढल्यानंतर ती भारतातील पहिली तृतीयपंथी पोलीस निरीक्षक बनलेली असते.

21 व्या शतकातही आपण तृतीयपंथीयांना समाजात सामावून घेतलेले नाही. आजही त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन संकुचित आहे. परंतु, तृतीयपंथीही वेगवेगळ्या क्षेत्रात प्रवेश करून आपला ठसा उमटवत आहेत. मात्र, अजूनही पाहिजे तेवढ्या प्रमाणात तृतीयपंथीयांना सामान्य माणसासारखा जगण्याचा हक्क मिळत नाही. तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारकडूनही अनेक प्रयत्न चालू आहेत. परंतु, जोपर्यंत समाजाची मानसिकता बदलणार नाही. तोपर्यंत तृतीयपंथी सामान्य आयुष्य जगू शकणार नाहीत.

– श्‍वेता शिगवण

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)