अत्याचार अन्‌ खुनप्रकरणाचे येणपेत संतप्त पडसाद

कराड, (प्रतिनिधी) – येणपे (ता. कराड) येथे महिलेवरील अत्याचार आणि खुनाचे संतप्त पडसाद गुरूवारी सकाळी उमटले. संतप्त जमावाने संशयिताच्या घरात घुसून साहित्याची मोडतोड करून कुटुंबातील दोघांना जबर मारहाण केली. संशयितांच्या कुटुंबियांसह त्या समाजातील अन्य कुटुंबानी गायरान जमिनीवर केलेले अतिक्रमण काढण्याची तसेच संबंधित कुटुंबांना गावातून बाहेर काढण्याचा ठराव तात्काळ ग्रामसभेत झाल्याशिवाय रक्षाविसर्जनाचा विधी न करण्याचा पवित्रा ग्रामस्थांसह मृत महिलेच्या कुटुंबियांनी घेतला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांसह, कराडचे उपअधीक्षक, तालुका पोलीस निरीक्षक फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.
सोमवारी गुरे चारण्यासाठी गेलेली येणपे येथील विवाहिता बेपत्ता झाली होती. दुसऱ्या दिवशी शिवारातील झुडूपात तिचा विवस्त्रावस्थेत मृतदेह आढळून आला होता. अत्याचार करून आणि गळा आवळून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी कराड तालुका पोलिसांनी मुख्य संशयीत करण शंकर कोळी (वय 22, रा. ओकोली, ता. शिराळा, जि. सांगली, मूळ रा. साकुर्डी, ता. कराड) यास अटक केली. तसेच दुसरा अल्पवयीन संशयीतास ताब्यात घेतले.
दरम्यान, गुरूवारी सकाळी मृत महिलेचा रक्षाविसर्जन विधी होता. यावेळी तिच्या कुटुंबियासह ग्रामस्थ आक्रमक झाले. जमावाने संशयीताच्या घरावर हल्ला करून घरातील साहित्याची तोडफोड केली. तसेच कुटुंबातील दोघांना जबर मारहाण करण्यात आली. त्यात दोघे जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, तालुका पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पाटील हे फौजफाट्यासह येणपे येथे दाखल झाले. पोलिसांनी जमावाची समजूत काढण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र, जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. संशयीतासह त्या समाजातील सर्व कुटुंबांना गावाबाहेर काढण्याचा ठराव घेण्यासाठी तात्काळ ग्रामसभा बोलविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. त्यानुसार ग्रामसभा घेण्यात आली. संशयितांना फाशीची शिक्षा व्हावी. तसेच संशयीतांच्या कुटुंबियांना देण्यात आलेली गायरान जमीन काढून घेण्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. त्यानंतर रक्षाविर्सजन विधी पार पडला.
दरम्यान, या महिलेवरील अत्याचार आणि तिचा खुनामुळे येणपे ग्रामस्थांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन गावात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परंतु, गुरूवारी ग्रामस्थांनी संशयीतांच्या घरावर हल्ला चढविल्याने येणपे गावातील बंदोबस्त आणखी वाढविण्यात आला आहे. यामुळे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. उपअधीक्षक नवनाथ ढवळे, तालुका पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर हे पोलीस फौजफाट्यासह येणपे येथे तळ ठोकून आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)