अत्याचारात शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा अत्याचार

कर्जतच्या एकाला आजन्म कारावास ः दंडाची रक्कम पीडितेला
आरोपीच्या बलात्काराच्या गुन्ह्याची गंभीर दखल

नगर – अत्याचारप्रकरणी शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणारा कर्जतमधील लहू देवराम पवार (रा. जलालपूर, कर्जत, हल्ली रा. पिंपरखेड, ता. जामखेड) याला जिल्हा न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. दंडाची रक्कम पीडित मुलीच्या कुटुंबियांना देण्याचा आदेश न्यायालयाने केला आहे. जिल्हा न्यायाधीश श्रीमती के. के. पाटील यांनी हा निकाल दिला. अतिरीक्त सरकारी अभियोक्ता ऍड. अनिल ढगे यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. पैरवी अधिकारी एस. ई. काथवटे यांनी त्यांना सहकार्य केले.

लहू पवार याने नात्यामधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. मुलगी खेळत असताना तिने लहू याच्याकडे खाऊ मागितला. लहूने चल तुला खाऊ देतो, असे म्हणून दुचाकीवर बसवून पळवून घेऊन गेला. नगर-दौंड रस्त्यावरील टाकळीभान (ता. श्रीगोंदे) येथे नेऊन एका पडीक शेत शिवारात तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर मुलीला राहू (ता. दौंड) येथे घेऊन गेला. याप्रकरणी श्रीगोंद्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

न्यायालयात खटल्यावर सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदार तापसले. तपासी अधिकारी उपनिरीक्षक गणेश हिवरकर यांच्याबरोबर, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. जिल्हा न्यायालयाने लहू पवार याला बाल लैगिंक अत्याचार संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार दोषी धरत जन्मठेपेची आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम न भरल्यास पुन्हा पाच महिने साधी कैदेची शिक्षा त्याला भोगावी लागणार आहे. अपहरणाच्या गुन्ह्यात लहू पवार याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास दोन महिने साधी कैद त्याला भोगावी लागणार आहे.

लहू पवार याने 2014 मध्ये अत्याचाराचा गुन्हा केला होता. या गुन्ह्यात त्याला सात वर्षे सक्तमजुरीची आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा झाली आहे. लहू पवार याने ही शिक्षा भोगून पुन्हा आल्यानंतर नव्याने हा गुन्हा केल्याचे सरकारी वकीलांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिले. तसे पुरावे सादर केले. न्यायालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेत लहू पवार याला या खटल्यात अत्याचार आणि अपहरणामध्ये आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)