अरुण गोखले
ऑफ तासाला दातेसरांना आलेले पाहून मुले खूष झाली. नमस्ते सर! असं म्हणून त्यांनी उठून त्यांचे स्वागत केले. आज आपण ह्या तासाला काय करायच? दाते सरांनी मुलांना विचारले.
गोष्ट…. मुलांनी इच्छा प्रदर्शित केली.
चालेल… गोष्ट ऐकूया, पण थोडी वेगळ्या प्रकारे. गोष्ट मीच सांगणार. तिचा शेवट तुम्ही करायचा, कसा? तर त्या गोष्टीचा मतितार्थ ज्या म्हणीतून व्यक्त होईल अशी एक म्हण सांगून.
दातेसरांची ती अट ऐकली आणि काही मुले संभ्रमात पडली. ते म्हणाले, हे काही अवघड नाही. तुम्ही मी सांगत असलेली गोष्ट नीट लक्ष देऊन ऐकली, तर त्यासाठी योग्य ती म्हण तुम्हाला सहज सुचेल. पहा प्रयत्न करा..
गावातल्या मंदिरापुढे उभा राहून एक भिकारी नेहमी भीक मागत असे. पण तो उगाच कोणापुढे हात पसरत नसे तर आपल्या गोड आवाजात देवाचे भजन म्हणे. कोणी दान दिलं तर घ्यायचा.
एकदा काय झालं. देवाला त्या भक्ताची दया आली. रात्री जेव्हा सारी मंडळी पांगली. तेव्हा देव त्या भिकाऱ्याच्या पुढे येऊन उभा राहिला आणि त्याला म्हणाला…. भक्ता! मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. बोल तुला काय आणि किती देऊ?
भिकारी म्हणाला, देवा! तू जर मला देणारच असशील तर मला सुवर्णमुद्रा दे.
देव म्हणाला, ठीक आहे, कर तुझी झोळी पुढे… देवानी भिकाऱ्याच्या झोळीत दोन मुठी सुवर्णमुद्रा टाकल्या. पुरे का? देवाने विचारले. त्यावर भिकारी म्हणाला, थोड्या आणखी…
देवानी आणखी दिल्या. विचारले पुरे ना? नाही…अजून थोड्या…
देवांनी ओळखले की मिळतंय म्हणून ह्याचा लोभ वाढत चाललाय. देव त्याला सावध करीत म्हणाले, हे बघ.. मला काय मी तू मागशील तेवढ्या मुद्रा देईन पण जर ह्यातली एक जरी मुद्रा खाली पडली तर सर्वच मुद्रांची माती होईल.
ते ऐकूनही भिकाऱ्याने आपली भरलेली झोळी आणखी मुद्रा हव्यात म्हणून पुढे केलीच. देव दिल्या वचनाप्रमाणे त्यात मुद्रा घालतच राहिला आणि…एकाक्षणी मुद्रांच्या ओझ्याने त्या भिकाऱ्याची झोळी फाटली, सगळ्या सुवर्णमुद्रा खाली पडल्या आणि…हे असं होत, म्हणूनच म्हणतात की…. वर्गातील मुलांनी एकमुखाने उत्तर दिले ….कारण अति तिथे माती…ते ऐकून दातेसरांनी सर्व मुलांचे कौतुक केले, आणि तासाचा टोल पडताच ते समाधाने वर्गाबाहेर पडले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा