अतिक्रमणमुक्‍त महामार्गांसाठी जादा कुमक

पोलीस अधीक्षक संदीप पाटील : रस्ते सुरक्षा समिती बैठकीत माहिती

जिल्ह्यात 900 होमगार्डस्‌ची नियुक्‍ती

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – “ग्रामीण भागातील अतिक्रमणे काढण्यासाठी तत्काळ पोलीस बंदोबस्त देण्यात येणार आहे. महामार्गांवरील चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगावसह सर्वच प्रमुख ठाण्यांत किमान 50 पोलीस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्ग अतिक्रमणमुक्‍त करण्यावर भर देणार,’ अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील सर्वच महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. चाकण, राजगुरूनगर, नारायणगाव, वाघोली या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्‍न अतिशय गंभीर झाला आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि अवैध वाहतूक करणारी वाहने चौकात पार्किंग केल्यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन कोंडी होते, याबाबत पोलीस प्रशासन काय उपाययोजना करणार आहे, असा प्रश्‍न खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठकीत उपस्थित केला होता.

पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले, नगरपरिषद व मोठ्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अतिक्रमणे काढण्यासाठी मागणी येताच तत्काळ पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येईल. वाहतूक नियंत्रण करण्यासाठी महामार्गावरील प्रत्येक पोलीस ठाण्याला आवश्‍यक ते पोलीस उपलब्ध करून दिले जातील. मात्र स्वयंसेवी संस्था अथवा नागरिकांनी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, परस्पर वाहतूक नियंत्रण करू नये अशी सूचनाही त्यांनी केली.

राजगुरूनगर येथील वाहतूक नियंत्रणासाठी नगरपरिषदेने 15 वॉर्डन उपलब्ध करून दिले आहेत. त्याप्रमाणे चाकण नगरपरिषदेसह मोठ्या ग्रामपंचायतीनीही ट्राफिक वॉर्डन द्यावेत अशी सूचना संदीप पाटील यांनी केली. जिल्ह्यात 900 नवीन होमगार्डची भरती करण्यात आली असून त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. हे प्रशिक्षण पूर्ण होताच त्यांचा वापर वाहतूक नियंत्रणासाठी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

नाशिक महामार्गावर खड्डेच खड्डे
पुणे-नाशिक रस्त्यावर राजगुरूनगर शहर आणि घाटात तसेच मंचर, नारायणगाव येथे मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. यामुळेही वाहतूक कोंडी होत आहे. हे खड्डे भरून तत्काळ रस्ते दुरुस्त करण्याची सूचना आढळराव यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)