अचानक वीजदाब वाढल्याने घरगुती उपकरणे जळाली

तापकीरनगरमधील नागरिक त्रस्त : उपाययोजनांची मागणी
पिंपरी – उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना रहाटणी-काळेवाडी परिसरातील विजेचा लपंडाव सुरू आहे. त्याचत भर म्हणून वीज पुरवठ्यादरम्यान विजेचा दाब अचानक वाढत असल्याने अनेक नागरिकांची घरगुती वीज उपकरणे जळाली आहेत. नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने, महावितरण कंपनीने याची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रहाटणी-काळेवाडी परिसरातील डॉ. जगदाळे रोड, गोंधळी समाज परिसर, तापकीरनगर, श्रीनगर या परिसरात ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता अनेक पटींनी वाढत आहे. एवढेच नव्हे, तर वीज पुरवठ्यादरम्यान अचानक विजेचा दाब वाढण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांचे टिव्ही, फ्रीज, पंखे, ट्यूब, बल्ब, ,इस्त्री, मिक्‍सर, संगणक आदी वस्तू बिघडल्या आहेत.

वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे नागरिक अक्षरश: त्रस्त झाले आहेत. याबाबत महावितरण कंपनीकडे वारंवार तक्रार करुनही त्याकडे अद्यापही गांभिर्याने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे घरात लाईट लावली तर वीजदाब वाढून उपकरणे जळण्याचा धोका, तर घरामध्ये पंखा न लावता एक मिनिटभरदेखील बसणे कठिण होत आहे. याशिवाय अन्य उपकरणे वापरताना देखील हे नागरिक अनेकदा विचार करत आहेत.

गेल्या महिनाभरापासून महवितरणच्या बेफिकीर कारभारामुळे रहाटणी-काळेवाडी परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. विजेचा लपंडाव आणि वीजदाब वाढल्याने घरगुती उपकरणे जळण्याचे प्रकार होत आहेत. त्यातच उन्हाळा सुरू असल्याने नागरिकांच्या गैरसोयीत आणखी भर पडत आहे. उन्हाळ्यात वीजेची मागणी वाढत असल्याने, महावितरणने त्याचे नियोजन करणे आवश्‍यक आहे. त्याकरिता तांत्रिक बिघाड दुरुस्त करुन, महावितरणने वीज ग्राहकांना दिलासा द्यावा.

मच्छिंद्र तापकीर, माजी विरोधी पक्षनेते, पिंपरी-चिंचवड महापालिका

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.