अखेर 23 फाट्याला उन्हाळी आवर्तन सुरू

केडगाव – येथील परिसरातील फाटा क्रमांक 23 ला अखेर उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

केडगाव (ता. दौंड) परिसरात मागील वर्षी पाऊस झालाच नाही, केवळ तुरळक हलक्‍या सरी कोसळल्या, त्यामुळे पावसाळा संपल्यावर सुरुवातीपासूनच पाण्याचा तुटवडा जाणवत होता. उन्हाळा सुरू झाल्यानंतर विहिरी आणि कूपनलिकांमध्ये असणारी पाण्याची पातळी चांगलीच खालावली. केडगाव आणि परिसरातील हंडाळवाडी, देशमुख मळा, दापोडी, कलानगर, खोपोडी या भागातील शेतीत असणाऱ्या पिकांची अवस्था दयनीय झाली. आता केवळ खडकवासला धरणातील पाण्याच्या आवर्तनावर शेतकरी अवलंबून होते. या भागात 22 फाट्यावर असणाऱ्या शेतकऱ्यांना बेबी कालव्याच्या पाण्यामुळे आधीच दिलासा मिळाला होता; परंतु फाटा क्रमांक 23 वरील शेतकरी आवर्तनापासून वंचित होते. शुक्रवार (दि. 3) मुठा उजव्या कालव्यातून आवर्तन सोडण्यात आल्याने आता शेतकरी सुखावला आहे.

  • शुक्रवारी (दि. 3) सोडण्यात आलेले आवर्तन पूर्ण क्षमतेने पुढील सात दिवस चालणार असून शेतकरी बांधवानी टेल टु हेड अशा पध्दतीने शेतीला पाणी देण्यासाठी पाटबंधारे विभागाला सहकार्य करावे. पाणी सर्वाना दिले जाणार असून, पाणी वाया जाणार नाही, याकडे लक्ष देऊन विभागाला सहकार्य करावे.
    – एस. एम. बनकर, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे कार्यालय, यवत

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.