अखेर पिंपरी मंडईतील ड्रेनेज दुरूस्तीचे काम सुरू

पिंपरी – लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईतील ड्रेनेज व्यवस्था कोलमडल्याने पावसाळ्यात गेली अनेक वर्षे मंडईत पाणी शिरण्याचे प्रकार घडत आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त दैनिक “प्रभात’ने दि. 7 जुलै 2018 रोजी प्रकाशित केले होते. त्याची दखल घेऊन आरोग्य विभागाने ड्रेनेजच्या दुरूस्तीला सुरवात केली असून त्यांचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. त्यामुळे वर्षानुवर्षांचा मंडईत पावसाळ्यात पाणी साचण्याचा प्रश्‍न मिटणार असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले.

जुलैच्या सुरूवातीला पावसाने दमदार हजेरी दिल्यामुळे पावसाचे पाणी मंडईत शिरले होते. त्याच बरोबर जागोजागी पत्र्याची चाळण झाली होती. तसेच ड्रेनेजलाईन फुटल्याने त्याचे पाणी थेट मंडईत घुसत होते. त्यामुळे मंडईत सगळीकडे दुर्गंधी पसरली होती. गेली अनेक वर्षे भाजी विक्रेत्यांना पावसाळ्यात हा त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्याबरोबरच याठिकाणी येणाऱ्या नागरिकांनाही या त्रासाचा सामना करावा लागतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दैनिक “प्रभात’ने याबाबतचे सविस्तर वृत्त सचित्र प्रसिध्द केले. त्यामुळे जागे झालेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाने ड्रेनेज लाईनच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. युध्द पातळीवर हे काम सुरु आहे. मंडईमध्ये येणाऱ्या नागरिकांना कामाचा त्रास होवू नये यासाठी रात्रीच्या वेळी देखील महापालिकेने काम सुरु ठेवले आहे. मंडईच्या एका बाजूचे काम पुर्णत्वाला आले आहे.

नवीन जलवाहिनी देखील टाकण्यात येत आहेत. त्यामुळे जुन्या जलवाहिन्यांमधून होणाऱ्या पाणी गळतीचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. ड्रेनेज लाईनचे काम पुर्ण होताच जलवाहिनीच्या कामाला सुरुवात होईल. पाण्याने उघडीप दिल्यामुळे मंडईच्या दुसऱ्या बाजूचे काम लवकर सुरू होण्याची शक्‍यता आहे. कचरा उचलण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी नियमित येत असल्याने मंडईत कचऱ्याचे प्रमाण पहिल्यापेक्षा कमी झाले असल्याची माहिती भाजी विक्रेत्यांनी दिली.

नवीन स्वच्छतागृहांची मागणी
मंडईतील व्यापारी आणि आलेल्या नागरिकांना स्वच्छतागृह असून नसल्यासारखे आहे. त्याची स्वच्छता होत नसल्याने तिथे दुर्गधी आणि डासांचे प्रमाण जास्त असल्याने तिकडे कोणीच फिरकत नाही. हे स्वच्छतागृह वारंवार तुंबते. त्यामुळे सर्वांची कुचंबना होत आहे. हे स्वच्छतागृह पाडून याठिकाणी अद्ययावर स्वच्छतागृह उभारण्याची मागणी भाजी विक्रेत्यांकडून होत आहे. महिलांसाठी स्वतंत्र दोन स्वच्छतागृह उभारावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)