अक्षम्य हलगर्जीपणा; चांगल्या गुणांची अपेक्षा असताना विद्यार्थी नापास

पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात विज्ञान शाखेच्या निकालात चूका झाल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नापास झाले आहेत. याच्या निषेधार्थ शुक्रवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे राज्य मंडळाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

बारावीच्या परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह मुख्य लेखी परीक्षेतही विद्यार्थ्यांना खूपच कमी गुण मिळाले आहेत. काही विद्यार्थ्यांच्या निकालात प्रात्यक्षिक परीक्षेचे गुणच नोंदविण्यात आलेले नाहीत. पेपर तपासणीमधील व निकालामधील चुकांमुळे विद्यार्थी नापास झाले आहेत. नापास झाल्याचे समजताच विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकानांही आश्‍चर्याचा धक्का बसला आहे.

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होत आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळण्याची अपेक्षा असताना बरेच विद्यार्थी नापास झाले आहेत. कनिष्ठ महाविद्यालयाने बोर्डाला व्यवस्थित गुणच पाठविले नाहीत, अशा तक्रारी काही पालकांकडून करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी व पालकांच्या तक्रारींवर आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अभाविपच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी सुमारे 150 विद्यार्थ्यांच्या एकत्रित तक्रारींचे निवेदन राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ.शुकंतला काळे यांना देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांच्या फोटोकॉपी त्वरित उपलब्ध करून द्याव्यात व उत्तरपत्रिकांच्या पुनर्मुल्यांकनाची प्रक्रियाही लवकर पूर्ण करावी. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी गांभीर्याने दखल घेण्यात यावी, अशी मागणी मागणी करण्यात आली आहे. त्यावर डॉ.काळे यांनी सकारात्मक आश्‍वासन दिले आहे. तक्रारींची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशाराही अभाविपचे पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.