अकोले नगरपंचायतींच्या एलईडी बल्ब खरेदी चौकशी होणार

अकोले – एलईडी खरेदी प्रकरणाची चौकशी होणार असल्याची माहिती युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन जगताप यांनी दिली. यासाठी शिक्षण विभागाने जे अकोले नगर पंचायतीला पत्र दिले आहे. त्याची प्रत पत्रकारांना सादर केली.
अकोले नगरपंचायतने अकोले शहरात नगरपंचायत हद्दीत सतरा प्रभागामध्ये जुन्या पोलवर बसविलेल्या एलईडी लाईट फिटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाला, अशी नागरिकांमध्ये चर्चा होती.अधिक माहिती मिळावी, यासाठी जगताप यांनी माहितीच्या अधिकारामार्फत माहिती मागविली होती. एलईडी खरेदीसाठी वापरलेला 4 हजार 610 पानांचा दस्तऐवजाचा अभ्यास केला असता त्यामध्ये शंका निर्माण झाल्या होत्या. नागरिकांमध्येही याची दबक्‍या आवाजात चर्चा होती. अशात नगरपंचायत सत्ताधारी अधिकारी व पदाधिकारी मूग गिळून शांत बसले होते. एकाच व्यक्‍तीच्या नावे तीन वेगवेगळ्या कंपन्या दाखवून या कामी नगरपंचायतला निविदा दिल्या गेल्या होत्या. ज्या 60-65 व्हॅटच्या एका एलईडीची किंमत 1200 ते 1500 होती. त्या एलईडीची किंमत 11 हजार 431 इतकी लावली गेली.
या तिन्ही कंपन्यांनी कमी अधिक वाढीव दराने निविदा भरून अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने काम करून घेतले असा आरोप जगताप यांनी केला. या तिन्ही कंपन्या वेगवेगळ्या दाखवलेल्या असताना देखील नगरपंचायत व ठेकेदार यांच्यामध्ये जो करारनामा झाला. त्यासाठी जे मुद्रांक वापरले गेले, त्या सर्व मुद्राकावरही डी.एल. चोथवे या व्यक्‍तीच्या सह्या आहेत. याचा अर्थ ह्या सर्व कंपन्यांचा मालक एकच असून ठेका मिळावा, यासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने सदर काम झाले असावे. अशी शंका निर्माण झाली व माहिती समाधानकारक न मिळाल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, यासाठी जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करून चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. त्याच अनुषंगाने मुद्देनिहाय अहवाल अकोले नगरपंचायतने आठ दिवसांच्या आत मूळ कागदपत्रांसह दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)