अकरा पाकीटमार गजाआड

निगडी – महिन्यापासून आकुर्डी रेल्वे स्थानक व आजूबाजूच्या परिसरात पाकीटमार गुंडांनी चांगलाच उच्छाद मांडला होता. या टोळीस प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या प्रयत्नामुळे पकडण्यात यश आले. काही दिवसांपासून समितीचे सदस्य रात्री गस्त घालत होते. टोळींवर स्वयंसेवकांनी पाळत ठेवली आणि तब्बल अकरा जणांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

रेल्वे प्रवाशांवर कटर, ब्लेड, कात्री, मिरची पूडने हल्ला करून लुटणाऱ्या या गॅंगला चांगलीच दहशत बसली. गेल्या अनेक महिन्यांपासून गुंड पाकीटमारांनी आकुर्डी रेल्वे स्थानकास जणू काही आपले हेड क्‍वॉर्टर बनवले होते. कासारवाडी, पिंपरी, भाटनगर, ताडीवाला रोड, चिंचवड, विद्यानगर, घोरावाडी, लोणावळा, तळेगाव येथून अनेक गुंड लुटालूट करण्यासाठी लोकलने येत होते. निर्जन आणि अंधाराचा फायदा घेऊन सदरचे गुंड प्रवाशांना जखमी करत. महिन्यापासून या घटना वाढल्या होत्या. नागरीक, स्टेशन रेल्वे कर्मचारी सुद्धा हैराण झाले होते. सदरच्या गॅंगचे लालिबाई, प्रियाबाई या महिला तसेच टकल्या आणि ढाकण्या असे गुंड नेतृत्व करीत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी स्टेशनवर प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या स्वयंसेवक – पोलीस मित्रांनी ऑपरेशन कटर गॅंग ही धडक मोहीम राबवली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला राज्य अध्यक्षा अर्चना घाळी, विद्या शिंदे, बाबासाहेब घाळी, अमृत महाजनी, अमोल कानु, अमित डांगे, संतोष चव्हाण, विशाल शेवाळे, देवजी सापारिया, जयेंद्र मकवाना, जयप्रकाश शिंदे, अजय घाडी, नितीन मांडवे, समीर चिले, तेजस सापरिया, राजेश बाबर, सतीश मांडवे, अश्विन काळे, कपिल पवार यांनी या मोहिमेत भाग घेतला. प्रवाशांनी सुद्धा सदरच्या धडक कारवाईचे कौतुक केले. मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी संजय पाचपुते, आकुर्डी रेल्वे स्थानकचे स्टेशन मास्तर राजेश कुमार, पॉइंटस्‌मन दत्ता खाडे, खडकी रेल्वे आर. पी. एफ. विभागाचे पोलीस उपनिरीक्षक डी. एन. लाड, आर. पी. एफ. आणि जी. आर. पी. एफ. चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तात्या करदाळे, भाऊ साळवे यांनीही अभिनंदन केले.

अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, आकुर्डी रेल्वे स्थानकावर दररोज 20 हजार प्रवाशांची आवक-जावक आहे. येथे अनेक महाविद्यालये असल्याने विद्यार्थी, महिला, पुरुष, नोकरदार रेल्वे प्रवाशांची दररोज अतिशय वर्दळ असते. याचाच फायदा गुंड पाकीटमार घेतात. पोलीस कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आणि रेल्वे पोलीस ठाणे जवळपास नसल्यामुळे याठिकाणी गुंडांनी बस्तान बसवले होते. या ठिकाणी पोलीस चौकी होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. चौकीसाठी मोठे ऑफिस सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे चौकी त्वरित सुरू करता येईल. पोलीस मित्रांचीही त्यांना समितीकडून मदत देण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)