अभ्यास मंडळ निवडीबाबत गुप्तता?
पुणे – राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी तसेच इयत्ता बारावीचा अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके पुढील शैक्षणिक वर्षापासून (2019-20) पासून बदलणार आहेत. यासाठी शासनाकडून अभ्यास मंडळ निवडण्यात येत असून अभ्यास मंडळाच्या निवडीबाबतची माहिती कोणत्याही अधिकृत संकेतस्थळावर न जाहीर करता एका खासगी कंपनीकडून भरण्यात येत आहे. त्यामुळे आतापर्यंत अभ्यास मंडळ समितीच्या निवडीबाबत जी लपवा छपवी केली गेली ती यंदाही होत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीसाठी ज्या समित्या होत्या. त्या सर्व बरखास्त करत दोन वर्षांपूर्वी पहिली ते बारावीसाठी एकच अभ्यास मंडळ तयार करण्यात आले होते. या मंडळातील सदस्यांची दोनवेळा पूनर्रचना करण्यात आली. मात्र, ही निवड प्रक्रिया कोणत्याही अधिकृत माहितीशिवाय पूर्ण करण्यात आली. याबाबत सर्व स्तरातून नाराजीही व्यक्त करण्यात आली होती. तसाच प्रकार आता अकरावी, बारावीचा अभ्यासक्रम बदलाच्या वेळी देखील केलेला दिसत आहे.
अकरावी बारावीचा अभ्यासक्रम बदलणार आहे; तसेच त्याच्या पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना करण्यात येणार आहे ही माहिती ना शासनाने विद्या प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली, ना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर केली. एका खासगी कंपनीची लिंक देत अभ्यास मंडळातील निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यापुर्वीही अशाच प्रकारे एका खासगी कंपनीच्या ऑनलाईन पोर्टलवर माहिती भरून ही निवड करण्यात आली होती. मुख्य म्हणजे या ऑनलाईन अर्ज भरण्याच्या पोर्टलची लिंक ही काही निवडक लोकांकडेच पहायला मिळते. अनेकांना याबाबत माहिती देखील दिली जात नाही. त्यामुळेच यासाठी काही निवडक शिक्षक व शिक्षणतज्ज्ञच अर्ज करताना दिसतात. यंदाही हा असाच प्रकार दिसून येतो आहे. दरम्यान, या अभ्यास मंडळ निवडीबाबत संकेतस्थळावर सूचना का नाही हे विचारण्यासाठी शिक्षण सचिव नंदकुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
अभ्यास मंडळ सदस्यत्वासाठी कोठे अर्ज करावा?
शासनाने यासाठी https://www.research.net/r/bosnew11-12std या लिंकवर अर्ज करावा असे आवाहन केले आहे. अर्ज संपूर्णपणे ऑनलाईन भरायचा असून याची लिंक 5 मे सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. यामध्ये चार शाखांचा पर्याय दिला असून त्यामध्ये कला, विज्ञान, वाणिज्य व व्यवसाय शिक्षणाचा समावेश आहे.
पाच वर्षांपूर्वी बदलला होता अभ्यासक्रम
यंदाच्या वर्षी दहावीचा अभ्यासक्रम बदलल्यानंतर शिक्षण विभागाकडून अकरावीचा अभ्यासक्रम बदलणे अपेक्षितच होते. यापुर्वी अकरावीचा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2012-13 साली बदलला होता; तर इयत्ता बारावीचा अभ्यासक्रम 2013-14 साली बदलला होता. राष्ट्रीय पातळीवर एकच परीक्षा होणार असल्यामुळे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायोलॉजीचा अभ्यासक्रम मात्र एक वर्ष अगोदर बदलण्यात आला होता.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा