अंमली पदार्थ विकणाऱ्यांना फाशी द्या – अजित पवार

मुंबई- मुंबई, ठाणेसह राज्यभरात आता अंमली पदार्थ सेवनाचे प्रकार वाढले असून यामुळे तरूण पिढी बरबाद होत आहे. महाविद्यालयाच्या परिसरात अंमली पदार्थ विकण्याचे प्रमाण वाढत असून त्याला आळा घालण्यासाठी अंमली पदार्थ विकणाऱ्यांना थेट फाशी देण्याचा कायदा करा, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली.

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थांची कुरिअर आणि पोस्टामार्फत विक्री होत असल्याबाबत अजित पवार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष वेधले. कॉलेज असणाऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ विकण्याचे प्रकार वाढले आहेत. आई आणि वडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे 11वी, 12वीला असणारा मुलगा किंवा मुलगी बाहेर काय करते? हे कळत नाही. त्यामुळे अंमली पदार्थांमुळे तरूण पिढी बरबाद होत असून याला रोख लावण्यासाठी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्याला फाशी देणारा कडक कायदा करा, अशी मागणी पवार यांनी यावेळी केली.

यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले, मंगळवेढ्यात इतर राज्यातून येणाऱ्या अंमली पदार्थासंदर्भात चेक नाक्‍यावरील सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्यात येईल व जे पोलीस अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मुंबईतील मानखुर्द व शिवाजीनगर येथील अल्पवयीन बालकांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

प्रत्येक जिल्ह्यात कक्ष – गृहराज्यमंत्री

मुंबईच्या धर्तीवर राज्यात ठाणे, पुणे व नागपूर या आयुक्तालयाच्या ठिकाणी व औरंगाबाद, नाशिक शहर, रायगड या जिल्ह्याकरीता स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन केले आहेत. यासंदर्भातील गुन्ह्याचे प्रकरण दिवाणी न्यायालयाऐवजी सत्र न्यायालयात चालविणे, दोन वर्षाची शिक्षा 10 वर्षे तर 10 वर्षाची शिक्षा 20 वर्षे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

शासनाने केलेल्या कारवाईअंतर्गत एक हजार 21 कोटी 73 लाख 21 हजार 853 रूपयांचे फेंटनेल ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. कोणताही निधी कमी पडू देणार नसल्याची माहिती गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)