अंड्यांचे दर स्थिरावल्याने ग्राहकांना दिलासा

Madhuvan

पिंपरी  –  करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोगप्रतिकारकशक्‍ती वाढविणाऱ्या अंड्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. तर मागणीएवढा पुरवठा होत नसल्याने अंड्यांचे दरदेखील वधारले आहेत. मात्र, गेली चार दिवसांपासून अंड्यांचे दर स्थिर राहिल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मार्च महिन्यात करोनाची तीव्रता जाणवू लागली. चिकन खाल्ल्यामुळे करोना होत असल्याची अफवा पसरल्याने चिकन व अंड्यांचा खप अगदीच कमी झाला. अगदी किरकोळ दरात चिकन व अंडी विकण्याची वेळ पोल्ट्री चालकांवर आली. त्यामुळे राज्यातील पोल्ट्री व्यवसाय धोक्‍यात आल्याने थेट केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली होती. दरम्यान, करोनावरील उपचारादरम्यान रोगप्रतिकारक शक्‍ती चांगली असलेल्या रुग्णांनी सहजपणे करोनावर मात केल्याची अनेक उदाहरणे प्रसारमाध्यमांवर दाखविण्यात आली. त्यामुळे प्रोटीन्सचा खजिना असलेल्या अंड्यांचा रोगप्रतिकारक शक्‍ती वाढविण्यात असलेल्या महत्त्वाच्या भूमिकेकडे लक्ष वेधले गेल्याने नागरिकांचा कल अंडी खरेदीकडे वाढत आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला मावळ, बारामती तालुक्‍यांमधून दररोज पाच ते सहा लाख अंड्यांचा पुरवठा होतो. सहा महिन्यांपूर्वीच्या अफवेचा फटका या उद्योगाला बसल्यानंतर हा उद्योग आता हळूहळू सावरत असून, शहराला दररोज साडे चार लाख अंड्यांचा पुरवठा होत आहे. मागणी वाढल्याने अंड्यांच्या दरातही वाढ झाली आहे. 8 सप्टेंबरला 4.85 रुपये प्रतिदराने होणाऱ्या अंड्याचा दर 20 सप्टेंबरला शेकडा 558 रुपयांवर पोचला होता. तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत शेकड्यामागे बारा रुपयांची वाढ होऊन दर 570 रुपयांवर स्थिरावला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.