अंगारकी चतुर्थीमुळे थेऊरला जत्रेचे स्वरूप

थेऊर- या वर्षातील दुसऱ्या अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील श्री चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी मंगळवारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे थेऊर गावाला जत्रेचे स्वरूप आले होते. दर्शनरांग थेट थेऊर-नायगांव रस्त्यापर्यंत गेली होती.
पहाटे तीन वाजता श्री चिंतामणीचे वंशपरंपरागत पुजारी गिरीश आगलावे यांनी विधिवत महापूजा व अभिषेक केला. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले गेले. मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. सकाळी नऊ वाजल्यानंतर भाविकांची वर्दळ वाढत गेली. चिंचवड देवस्थानच्या वतीने सकाळी सात वाजता ट्रस्टचे विश्वस्त ह. भ. प. आनंदमहाराज तांबे यांच्या उपस्थितीत महापूजा करण्यात आली. देवस्थानच्या वतीने भाविकांना उपवासाची खिचडी तर चिंतामणी तरुण मंडळाच्या वतीने साबुदाना चिवड्याचे वाटप करण्यात आले. चतुर्थीच्या निमित्ताने मंदिरात आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. आगलावे बंधूच्या वतीने दर्शनबारीवर मंडप आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले या अधिकाऱ्यांसमवेत पोलीस कर्मचारी, होमगार्ड, पोलीस मित्र व मंदिर सुरक्षा रक्षकांचा चोख बंदोबस्त होता. तसेच पोलीस हवालदार एस. जी. शिंदे व एस. एस. देवकर यांनी वाहतुकीचे नियोजन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)