अंकिता पाटील यांची “राजकीय इनिंग’सुरू

जिल्हा परिषद गट बावडा-लाखेवाडीच्या पोटनिवडणुकीसाठी भरला अर्ज

बावडा/रेडा- बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी गुरुवारी (दि. 6) इंदापूर तहसील कार्यालयात कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे खऱ्या अर्थाने अंकिता पाटील यांची राजकीय इनिंग सुरू झाली आहे.

इंदापूर येथील शाह सांस्कृतिक भवन येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अध्यक्षपदावरून बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, ही निवडणूक भावनिक असून उमेदवार देणे हे अपरिहार्य असते आणि या ठिकाणच्या जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी हक्‍काची व्यक्ती हवी म्हणून कार्यकर्त्यांच्या मागणीस अनुसरून अंकिताला उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीने आघाडी धर्म पाळला, इतरांनीही निवडणूक बिनविरोध कशी होईल यासाठी प्रयत्न करावेत. याचा राज्यभर चांगला संदेश जाईल.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले की, या जागेसाठी उमेदवारी देणे म्हणजे आघाडी धर्माच्या विरोधात झाले असते, त्याचबरोबर निवडणूक बिनविरोध करावी, असे आदेश वरिष्ठांकडून आले आहेत.

अंकिता पाटील म्हणाल्या की, वीज, पाणी, शिक्षण यामध्ये ग्रामीण भागात आजही कमतरता भासते. वडील माजी मंत्री हर्षवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करू. ही निवडणूक उत्साहाची नसून भावनिकतेची आहे. माझ्यावर सर्वांनी दाखवलेला विश्वास व जबाबदारीचे भान ठेवून काम करीत राहील.

यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष कृष्णाजी यादव, भाग्यश्री पाटील, सभापती अप्पासाहेब जगदाळे, उदयसिंह पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, मयूरसिंह पाटील, बावड्याचे सरपंच किरण पाटील, विकास पाटील, अशोक घोगरे, अकलूज कारखान्याचे संचालक महादेव घाडगे, पंचायत समितीचे सभापती करणसिंह घोलप, उपसभापती देवराज जाधव यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक रघुनाथ पन्हाळकर, तर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बापू जामदार यांनी आभार मानले.

  • निवडणूक बिनविरोध निश्‍चित!
    बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या रत्नप्रभा देवी पाटील यांच्या आकस्मिक निधनाने या गटाचा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केलेले आवाहन तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेले आघाडी धर्माचे पालन यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार, हे निश्‍चित झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.