अँड्रॉइड पाय येतोय

तुमच्या हातातील स्मार्टफोनला खऱ्या अर्थाने स्मार्ट बनवते ती म्हणजे स्मार्टफोन मधील कार्यप्रणाली (शुद्ध मराठीत ऑपरेटिंग सिस्टीम). गुगलद्वारे विकसित करण्यात आलेली ‘अँड्रॉइड’ ही ऑपरेटिंग सिस्टीम जगभरातील बहुतांश स्मार्टफोन्सवर वापरण्यात येते. वापरकर्त्यांसाठी दरवर्षी आपल्या नावाप्रमाणे काहीतरी ‘स्वीट’ नवीन फिचर देण्याचा गुगलचा प्रयत्न असतो. याही वर्षी गुगलने आपला पायंडा पुढे चालवत स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या भेटीला ‘अँड्रॉइड पाय’ ही ‘अपडेट’ सादर केली आहे. पाहुयात यावर्षीच्या अँड्रॉइडमध्ये काय “स्वीट सरप्राईझ’ दडलं आहे.

यावर्षीची अँड्रॉइड अपडेट म्हणजेच अँड्रॉइड 9.0 अँड्रॉइड पाय ही संपूर्णपणे “आर्टिफिशियल इंटीलिजन्स’ म्हणजेच यांत्रिक बुद्धिमत्तेवर आधारित असणार आहे. वापरकर्त्याची आवड-निवड लक्षात घेऊन “अँड्राईड पाय’ कार्यप्रणालीमध्ये बदल घडवून आणण्यास सक्षम असणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बॅटरीचा वापर:
अनेकवेळा आपण आपल्या स्मार्टफोन्सची बॅटरी जास्त वेळ टिकत नसल्याची तक्रार करत असतो. अँड्रॉइड पायमध्ये बॅटरी जास्त काळ टिकावी यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येणार आहे. अँड्राईड पाय तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये कोणते अॅप्लिकेशन वापरत व कोणते वापरत नाही याचा आढावा घेऊन वापरात न येणाऱ्या अॅप्लिकेशन्सना आपोआप बंद करणार आहे. यामुळे तुमच्या बॅटरीची बचत होऊन ती जास्त वेळ काम करू शकणार आहे. याचबरोबर अँड्रॉइड पाय तुम्ही तुमचा स्मार्टफोन वापरताना किती “ब्राईटनेस’ ठेवता याचे निरीक्षण करून आपोआप ब्राईटनेस कंट्रोल देखील करू शकणार आहे.

तुमच्या वेळापत्रकानुसार बदलणार तुमचा स्मार्टफोन:
तुम्ही सकाळी व्यायामाला जाताना, ऑफिसला जाताना किंवा घरी असताना कोणते अॅप्स वापरता याचे निरीक्षण करून अँड्रॉइड पाय तुमच्या वेळापत्रकानुसार अॅप्लिकेशन मांडणी करून देईल. हे अपडेट तुम्ही स्मार्टफोनला हेडफोन जोडल्याबरोबर तुमच्या आवडीच्या गाण्यांची “प्ले-लिस्ट’ देखील उपलब्ध करून देणार आहे.

वेळेचा लेखाजोखा व नियोजन:
तुम्ही तुमच्या स्मार्टफोन सोबत किती वेळ घालवला याची आकडेवारी देखील आता तुम्हाला अँड्रॉइड पायद्वारे मिळणार आहे. तसेच तुम्हाला जर सतत तुमचा स्मार्टफोन चेक करायची सवय असेल तर तुम्ही दिवसातून तुमचा स्मार्टफोन किती वेळा चेक केला याचे गणित देखील अँड्रॉइड पाय मांडेल. तुम्ही तुमचा किती वेळ एखाद्या अॅप्लिकेशन घालवू इच्छिता याचे नियोजन देखील आता तुम्ही करू शकणार आहात.

गुगल दरवर्षी ग्राहकांना अँड्रॉइडच एक नवीन अपडेट देत असते. इंग्रजी वर्णमालेनुसार अद्याक्षरावरून दरवर्षीच्या अँड्रॉइड व्हर्जन्सना गोड पदार्थाचं नाव देण्याचा गुगलचा पायंडा आहे. गेल्या वर्षीच्या अँड्रॉइडला ‘O’ या अद्याक्षरावरून ओरिओ हे नाव देण्यात आले होते त्यामुळे यावर्षी अँड्राइडचे नामकरण ‘O’ चा पुढील शब्द ‘P’ वरून घेण्यात आले असून अँड्रॉइडला ‘पाय’ या गोड पदार्थाचे नाव देण्यात आले आहे.

– प्रशांत शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)