बाजारभाव वाढल्याने शेतकरी समाधानी : लागवडीसाठी लगबग
सोरतापवाडी – फूलशेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या हवेली तालुक्यातील सोरतापवाडी परिसरात गुलछडी, अस्टर, झेंडूची लागवड सुरू झाली आहे. तसेच मागील महिन्यांत राजा रत्नमची लागवड झाली आहे. लिली, गुलछडी, झेंडूचा बाजारभाव वधारल्यामुळे फूल उत्पादक शेतकरी सुखावला आहे. गेल्या तीन आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे झेंडूला फटका बसला आहे. सध्या बाजारात झेंडूचा बाजारभाव वाढल्यामुळे शेतकरी फुलला आहे.
सोरतापवाडी परिसरातील गावांत गेल्या दहा ते बारा दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने फूल उत्पादक शेतकरी सुखावला आहे. पोषक वातावरणामुळे फुलशेतीचे उत्पादन वाढणार आहे. नैसर्गिक आपत्तींना तोंड देत शेतकऱ्यांनी फुलशेती टिकवून ठेवली आहे. पारंपरिक पद्धतीने फूलशेती करताना आता शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीची कास धरली आहे. यावर्षी जून महिना पावसाअभावी कोरडा गेल्याने जुलै महिन्यात पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे फुलांच्या विविध प्रकारची रोपे टाकण्यासाठी वातावरण तयार झाले. सध्या बाजारभावात चढ- उतार होत असल्यामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत आहे. गुलछडीला 20 रुपये बाजारभाव मिळत आहे. पावसामुळे या फुलांच्या लागणी झाल्या आहेत. कधी कमी- जास्त भाव मिळत आहे. लिलीच्या फुलांची गड्डी 2 ते 3 रुपयांना मिळत आहे.
आषाढ महिन्यामुळे फुलांच्या मागणीत घट झाली आहे. झेंडूची फुले पावसामुळे थोडीशी खराब झाली आहेत. त्याचा दर दिलासादायक आहे. आता 40 रुपये भाव आहे. अस्टर फुलांच्या पिकाची लागवड परिसरात हळूहळू होत आहे. गौरी गणपती व नवरात्रोत्सवात फुलांना मागणी असते. पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी रोपासाठी बियाणांची टोकणी केली होती. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी रोपे टाकली. त्यांची रोपे लागवडीसाठी तयार आहेत. राजा रतलम् फुलांची लागवड एप्रिल व मे महिन्यात करण्यात येते. ती फुले दिवाळीत सुरू होतात. गुलाबाची शेतीही बारमाही असल्यामुळे त्याचा बाजारभाव सतत कमी जास्त होत असतो. फुलशेतीने या भागातील शेतकऱ्यांची आर्थिक घडी बसवली आहे. सण-उत्सवांसाठी फुले पुरविण्यास येथील शेतकरी कायम सज्ज आहेत.
पावसाने उशिरा का होईना हजेरी लावल्याने सोरतापवाडी परिसरात शेतकरी सुखावला आहे. आम्ही फुलांची मागणी पाहून सण, उत्सवात पुणे, मुंबईला पाठवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. निसर्गाची कृपा व बाजारभावाची साथ लाभली तर हा हंगाम शेतकऱ्यांना चांगला जाईल.
– अमोल चौधरी, फूल उत्पादक शेतकरी