कोयना नदीत बुडून युवकाचा मृत्यू

पाटण – पाटणपासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर कोयना नदीवरील नेरळे पूलाजवळ 22 वर्षीय युवकाचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. विजय विलास संकपाळ असे मृत युवकाचे नाव आहे. दरम्यान, या युवकाला पाण्यात बुडत असताना अनेकांनी वाचवण्याचे प्रयत्न केले. परंतु पाण्याचा वेग व प्रवाह मोठा असल्याने त्यांना अपयश आले. या घटनेची फिर्याद त्याचे चुलते लक्ष्मण यशवंत संकपाळ यांनी पाटण पोलिसात दिली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, विजय विलास संकपाळ (वय 22, रा. झाकडे, किल्ले मोरगिरी, ता. पाटण) सध्या रा. मुंबई हा युवक आपल्या मुळगावी झाकडे या ठिकाणी सुट्टीसाठी आला होता. मंगळवार, दि. 21 रोजी दुपारी दोनच्या सुमारास आपले चुलते व मित्रांसोबत कपडे धुण्यासाठी व पोहण्यासाठी तो कोयना नदीमध्ये गेला होता. नदीपात्रामध्ये पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो नेरळे पुलानजीक असलेल्या पाटणला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकेंद्राजवळील पाण्याच्या डोहामध्ये गेला व तो सरळ पाण्यामध्ये बुडू लागला.

यावेळी त्याच्या बहिणीने आरडाओरडा करताच पुलाजवळ आंघोळ करणाऱ्या युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु त्या वेळी हा युवक पाण्यामध्ये खोल बुडालेला होता. तिथे उपस्थित असणारे विशाल शिर्के, दत्ता शिर्के, शंकर सुतार या युवकांनी थेट नदीमध्ये उडी मारुन युवकास शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संबधित युवकाच्या गळ्यामध्ये असणारी चेन पाण्याच्या आत मध्ये चमकल्याने या युवकांनी संबधित युवकाला पाण्यामध्ये आत पाहून पाण्याच्या बाहेर काढले. त्यानंतर घटनास्थळावरुन यास पाटण ग्रामीण रुग्णालय पाटण या ठिकाणी हलवण्यात आले.

पाटण ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यास दाखल करण्यात आले. मात्र उपचारा पूर्वीच तो मृत झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सदर घटनेची फिर्याद युवकाचे चुलते लक्ष्मण यशवंत सपकाळ यांनी पाटण पोलिस स्टेशनला दिली आहे. सदर घटनेचा तपास सपोनि यु. ए. भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली खांडे करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here