वर्गमैत्रीण न बोलल्याने युवकाची आत्महत्या

कोल्हापूर (प्रतिनिधी) – वर्गमैत्रीण न बोलल्याच्या नैराश्‍यातून बारावीतील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. श्रीराम संजय कोळी (वय 18, मूळ रा. गोंदवले, माण, सातारा) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी बारावीचा पेपर दिल्यानंतर वर्गाबाहेर त्याने मैत्रिणीला थांबवले; पण ती न बोलताच निघून गेल्याने आपण आत्महत्या केल्याचे त्याने चिठ्ठीत लिहून ठेवले होते.

श्रीरामचे वडील डॉक्‍टर आहेत. तो शिक्षणासाठी मोठ्या बहिणीसोबत कोल्हापुरात राहत होता. त्याची बहीण इंजिनिअर असून, खासगी कंपनीत नोकरी करते. मंगळवारी त्याने पेपर दिला. दुपारी दीडच्या सुमारास बहिणीने फोन केला असता त्याने पेपर सोपा गेल्याचेही सांगितले. सायंकाळी बहीण फ्लॅटवर आली असता आतून फ्लॅट बंद होता. तिने हाक देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने तिने खिडकीतून पाहिले. श्रीरामने खोलीतील सीलिंग फॅनला दोरीने गळफास घेतल्याचे दिसले. तिने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना बोलावले. त्याला फास सोडवून सीपीआर रुग्णालयात आणले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

श्रीरामच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी पोलिसांना मिळून आली. यामध्ये “माझे मैत्रिणीवर खूप प्रेम आहे; पण ती माझ्याशी बोलत नाही. आजही मी तिला थांबवले; पण ती बोलली नाही. मी जगून काय करू, असा मजकूर लिहिला होता. या घटनेची माहिती पोलिसांना समजल्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर हॉस्पिटल इथं पाठवला. या घटनेचा अधिक तपास राजारामपुरी पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)