राज्यात सुरू होणार आपला दवाखाना ; १०० युनिटला मंजुरी- आरोग्यमंत्री

परिपूर्ण प्राथमिक आरोग्य सेवेसाठी १५१ आरोग्यवर्धिनी केंद्रांचे लोकार्पण

मुंबई: राज्यात परिपूर्ण प्राथमिक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य उपकेंद्रांचे व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात येत आहे. ‘आयुष्यमान भारत’ अंतर्गत राज्यातील १५१ आरोग्यवर्धिनी केंद्रांचे लोकार्पण आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. या केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना प्राथमिक स्तरावर १३विविध प्रकारच्या आरोग्य सेवा पुरविण्या बरोबरच उपकेंद्रांचे बळकटीकरण केले जाणार आहे. दरम्यान राज्यात आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा पुरविण्यासाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू करण्यात येत असून केंद्र शासनाच्या माध्यमातून 100 युनिटला मंजुरी मिळाल्याची माहिती यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आरोग्यवर्धिनीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला परिपूर्ण आरोग्यसेवा

सर्वसामान्य जनतेला खासगी आरोग्यसेवा परवडण्याजोग्या नसतात. राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी आरोग्य उपकेंद्रांचे व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे  नागरिकांना त्यांच्या घराजवळील आरोग्य केंद्रात औषधांची उपलब्धता, औषधोपचार, वैद्यकीय तपासण्या, तसेच मानसिक आरोग्य, माता व बाल आरोग्य संबंधीच्या अत्यंत महत्वाच्या १३ प्रकारच्या आरोग्य सुविधा मोफत मिळणार असून त्यामुळे सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार असल्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राज्यात हेल्थ वेलनेस सेंटरच्या माध्यमातून 12 हजार आरोग्य केंद्रांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. राज्यात वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येत असून त्या माध्यमातून झोपडपट्टीमधील नागरिकाला मोफत आरोग्य सुविधा देण्यात येणार आहे. काल ठाण्यात आपल्या दवाखान्याच्या 2 केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले असून राज्यात 100 सेंटरसाठी मंजुरी मिळाल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.

शिंदे म्हणाले, दुर्गम भागात उत्तम आरोग्यसेवा पुरविण्यासाठी आशा वर्कर्स यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या मागण्यांसाठी शासन सकारात्मक असून त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील आरोग्य सोयी सुविधा बळकटीकरणासाठी चालू आर्थिक वर्षात १ हजार १२ आरोग्य उपकेंद्रे, ग्रामीण भागातील ४७९ व शहरी भागातील  १२५ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील ४ आकांक्षित गडचिरोली, वाशिम, उस्मानाबाद व नंदुरबार व इतर १५ भंडारा, चंद्रपूर, वर्धा, सातारा, पालघर, नाशिक, लातूर, पुणे,अहमदनगर, नांदेड, हिंगोली, गोंदिया, अमरावती, सिंधुदुर्ग, जळगांव जिल्ह्यातील येऊन ३१२ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. या केंद्रांमध्ये प्रशिक्षण घेतलेले आरोग्य अधिकारी, डॉक्टर, आरोग्य सेविका, बहुउद्देशीय आरोग्य सेवक, आशा वर्कर यांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत. तसेच आरोग्यवर्धिनी केंद्रांवर औषधी व प्रयोगशालेय तपासण्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

आरोग्यवर्धिनी या शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत राज्यामधील सर्व १० हजार ६६८ उपकेंद्रे, ६०५ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे व १ हजार ८२८ ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये (हेल्थ अँड वेलनेस सेंटर) रूपांतर करण्यात येणार आहे

आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रुग्णांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधा –

 • प्रसूतीपूर्व व प्रसूती सेवा
 • नवजात अर्भक व नवजात बालकांना दिल्या जाणाऱ्या सेवा
 • बाल्य व किशोरवयीन आजार व लसीकरण सेवा
 • कुटुंब नियोजन
 • संसर्गजन्य रोग नियोजन व सामान्य रुगांची बाह्य रुग्ण तपासणी
 • संसर्ग जन्य रोग नियोजन व तपासणी
 • असंसर्गजन्य रोग व नियोजन व तपासणी
 • मानसिक आरोग्य नियोजन व तपासणी
 • नाक, कान, घसा व डोळे सामान्य आजार संबंधीच्या सेवा
 • दंत व मुख आरोग्य सेवा
 • वाढत्या वयातील आजार व परिहरक उपचार
 • प्राथमिक उपचार
 • आपत्कालीन सेवा
 • आयुर्वेद व योग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)