नवी दिल्ली: उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याच्या कारणावरून दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर खटला भरण्यास केंद्र सरकारने अनुमती दिली आहे. तथापी आपल्यावर जे आरोप सीबीआयने केले आहेत ते हास्यास्पद आहेत अशी टीका सत्येंद्र जैन यांनी केली आहे. ते म्हणाले की दिल्लीतील अनधिकृत वस्त्या अधिकृत करण्याचा प्रयत्न आपण सुरू केल्यानंतर केंद्र सरकारने आपल्यावर आकसाने ही कारवाई केली आहे. पण असले शंभर खटले जरी मोदी सरकारने आपल्यावर भरले तरी आपण आपल्या इराद्यापासून तसूभरही ढळणार नाहीं असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सीबीआयने अलिकडेच सत्येंद्र जैन, त्यांच्या पत्नी पुनम, आणि त्यांच्या अन्य काही सहकाऱ्यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्ता जमवल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल केला आहे. या संबंधात जैन यांनी म्हटले आहे की या आरोपपत्रात दिल्लीतील अनधिकृत वस्त्या कायम करण्याचा प्रयत्न आपल्याकडून सुरू असल्याचा उल्लेख या आरोपपत्रात करण्यात आला आहे. जर समजा मी दिल्लीतील अनधिकृत वस्त्या अधिकृत केल्या तर त्याचा लाभ कोणाला होणार आहे असा सवाल त्यांनी केला.
मोदी सरकारचे हस्तक असलेल्या सीबीआयने आपल्यावर केलेले हे आरोप हास्यास्पद आहेत. मी या अनधिकृत वस्त्या अधिकृत करण्याचे काम शेवटपर्यंत तडीला नेणार आहे असे ते म्हणाले. दिल्लीत सुमारे सतरा हजार वस्त्या अनधिकृत आहेत. तेथे हजारो नागरीक वास्तव्याला आहेत त्यांना आपण बेघर होऊ देणार नाही असा निर्धारही जैन यांनी केला आहे. दरम्यान या विषयी प्रतिक्रीया देताना आम आदमी पक्षाने म्हटले आहे की गृह विभागाने सत्येंद्र जैन यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यास सीबीआयला दिलेली अनुमती हा केंद्र सरकारने अनाधिकृत वस्त्या अधिकृत करण्याच्या प्रयत्नात घातलेला खोडा आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा