पुण्यातून बेपत्ता तरुण माओवाद्यांचा डेप्युटी कमांडर

शहरात खळबळ : छत्तीसगढ पोलिसांच्या यादीमध्येही नावाचा समावेश

पुणे – शहरातील कासेवाडी परिसरातून 9 वर्षापूर्वी बेपत्ता झालेला तरुण छत्तीसगढमध्ये माओवादी संघटनेचा डेप्युटी कमांडर झाल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. हा तरुण कबीर कला मंचाशी संबंधीत होता. त्याने घरातून जाताना मुंबईला चित्रकला प्रदर्शनाचे काम मिळाल्याचे सांगितले होते.

शनिवारवाड्यावरील एल्गार परिषदेच्या प्रकरणातून मागील एक ते दीड वर्षे पुणे पोलिसांकडून माओवादी संघटनांशी संबंधित असल्याच्या कारणांवरुन अनेक बुद्धिवंतांना ताब्यात घेतले आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. असे असतानाच छत्तीसगढ पोलिसांनी राजनांदगावमध्ये होणाऱ्या माओवादी कारवायांबाबतची एक महत्त्वाची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये नाव- विश्वा, वय 28, रा. पुणे, महाराष्ट्र’ या तरुणाची नोंद केलेली आहे. छत्तीसगढ पोलिसांच्या यादीमध्ये 14 नावांचा समावेश आहे. त्यामध्ये विश्वा’ हे नाव आहे.

या यादीमध्ये उल्लेख असलेला माओवादी कमांडर विश्वा म्हणजेच कासेवाडी भागातून नोव्हेंबर 2010 अचानक बेपत्ता झालेला संतोष वसंत शेलार आहे. माओवादी संघटनेच्या राजनांदगाव येथील तांडा विभाग समितीचा तो डेप्युटी कमांडर झाला आहे, असा उल्लेख छत्तीसगढ पोलिसांनी केला आहे.

100 रुपये घेऊन सोडले घर!
कासेवाडीतील लक्ष्मी माता मंदिराजवळ राहणाऱ्या वसंत शेलार यांचा लहान मुलगा संतोष हा दि.7 नोव्हेंबर 2010 रोजी सकाळी घरातून निघून गेला. त्याने नववीपयर्यंत शिक्षण घेतले होते, तसेच त्याची चित्रकलाही चांगली होती. संतोषने 100 रुपये, चित्रकलेची पुस्तके व लाल रंगाची बॅग घेतली. मला मुंबईमध्ये दोन वर्षांसाठी चित्रकलेचे काम मिळाले आहे’ असे आईला सांगून तो घराबाहेर पडला. त्यानंतर तो पुन्हा त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आला नाही. कुटुंबीयांनी अनेक दिवस शोध घेऊनही तपास लागला नाही. त्यामुळे अखेर तीन महिन्यांनी म्हणजेच, दि.10 जानेवारी 2011 रोजी म्हणून त्याच्या मोठ्या भावाने याप्रकरणी कासेवाडी पोलीस चौकीमध्ये लहान भाऊ हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)