नवी दिल्ली – 2015 साली झालेल्या निवडणूकांच्या प्रचार फेरी दरम्यान एका व्यक्तीला बेसबॉल बॅटने मारल्या प्रकरणी आम आदमी पक्षाचे आमदार सोम दत्त यांना न्यायालयाने सहा महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावली असून दोन लाखांचा दंड देखील केला आहे.
यावेळी सोम दत्त यांनी आपला बचाव करताना सांगितले की, ते एक आमदार असून आगामी निवडणूकांची तयारी करत आहेत त्यामुळे त्यांना शिक्षेतून सुट मिळावी. यावर न्यायालयाने त्यांना फटकारताना सांगितले की, आमदार हा जनतेचा सेवक असून तो जनतेचा प्रतिनिधी असतो. त्यामुळे त्याने केलेल्या कृतीचे गांभीर्य त्यांना ठाऊक असायला हवे. त्यातच ही घटना रागाच्या भरात न घडता हा ठरवून केलेला हल्ला होता. त्यामुळे अशा प्रकरच्या घटनांची गांभिर्याने दखल घेत संबंधीत व्यक्तीला शिक्षा होणे गरजेचे आहे असेही न्यायालयाने नमूद केले.
तसेच न्यायालयाने सोम दत्त यांना 10,000 रुपयांच्या जातमूचलक्यावर 5 ऑगस्ट पर्यंत जामीन मंजूर केला असून न्यायालयाने या वेळी सांगितले की, अशा प्रकारच्या महत्वाच्या हुद्यावर असलेल्या लोकांनी केलेल्या गुन्ह्यांमधून त्यांना जर सुटका दिली तर सामन्यांचा न्यायालयावरुन विश्वास उडेल. कोणीही कायद्या पेक्षा मोठे नाही त्यामुळे सर्वांनीच कायद्याचा सन्मान करायला शिकले पाहिजे.