आप है तो हम है, और हम नही तो कोई नही ; डॉ. विखे यांचा शायरीतून नेमका इशारा कुणाला

पाथर्डी: ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पाथर्डी येथे झालेल्य्‌ा प्रचार सभेत डॉ. सुजय विखे यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी आप है तो हम है, और हम नही तो कोई नही, अशी केलेली शेरोशायरी चर्चेचा विषय ठरली आहे. डॉ. विखेंनी शायरीतून दिलेला गर्भीत इशारा विरोधी उमेदवाराला की पक्षांतर्गत विरोधकांना याबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात गेल्या तीन वर्षांपासून डॉ. विखे निवडणुकीची तयारी करत आहेत. निवडणूक लढवणारच, या इराद्याने त्यांनी निवडणूक घोषणेपूर्वीच संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढलेला आहे. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी झाले आहेत. सततच्या संपर्कामुळे सर्वसामान्यांशी नाळ जोडली गेल्यामुळे निवडणुकीला सामोरे जाताना त्यांना प्रचंड आत्मविश्वास वाटू लागला आहे.

मुरब्बी राजकारण्याला साजेशे निर्णय त्यांनी यापूर्वी घेतले आहेत. पाथर्डीच्या सभेतील शेरोशायरी त्याचाच एक भाग मानला जात आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून विखे यांची उमेदवारी प्रस्थापित नेत्यांना सुरुवातीपासूनच अडचणीची वाटत होती. त्यातच ऐनवेळी त्यांनी भाजपत प्रवेश करून उमेदवारी पदरात पाडून घेतली. त्यांच्या भाजपच्या उमेदवारीचा अनेकांनी धसका घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते विधानसभेच्या निवडणुकीतही विखेंची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत राहिल्यास आपल्या अस्तित्वाचे काय? अशी भीती अनेकांना वाटू लागली. वेगवेगळ्या चर्चांचे खापर माध्यमांवर फोडून कुठलेही मतभेद नसल्याचे जाहीर सांगितले जात असले, तरी खरी परिस्थिती लपून राहिलेली नाही. विश्वासू यंत्रणेच्या माध्यमातून चाणाक्ष विखेंनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्याचे दिसून येते. विविध भागांनुसार निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन उपाययोजना सुरू केल्याचे मानले जाते.

पाथर्डी येथे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत विधानसभा निवडणुकीत आपण व आपले सहकारी आ. मोनिका राजळे यांचे काम करणार असल्याची घोषणा करत स्थानिक ठिकाणी निर्माण झालेली परिस्थिती शमविण्याचा प्रयत्न केला. आपण लोकसभेनंतर कुठलीही स्वतंत्र यंत्रणा उभी करणार नसल्याचे सांगत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. या सभेतील डॉ. विखे यांच्या अभ्यासपूर्ण, आक्रमक व मुद्देसूद भाषणाने उपस्थित जनसमुदायासह व्यासपीठावरील मान्यवरही प्रभावित झाले. नामदार पंकजा मुंडे यांनीही विखेंच्या भाषण शैलीचे जाहीर कौतुक केले. मात्र भाषणाचा शेवट करताना डॉ. विखे यांनी केलेली शायरी चर्चेचा विषय ठरला आहे. व्यासपीठाला उद्देशून डॉ. विखे म्हणाले, आप है तो हम है, और हम नही तो कोई नही, यातून डॉ. विखे यांनी दिलेला इशारा विरोधी उमेदवाराला की पक्षांतर्गत गडबड करणाऱ्या कार्यकर्त्यांना, याबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)