थोरल्या साहेबांचा “यॉर्कर’

 राष्ट्रवादीकडून सेनेच्या विकेटची तयारी; सेना “हॅट्ट्रिक’च्या तयारीत

– रोहिदास होले

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मावळ : बारामतीसह मावळ आणि शिरुर काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीनंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने रुसवे फुगव्यातून “वाट’ काढत युतीची डरकाळी फोडली.

मात्र मावळ लोकसभा मतदारसंघात भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये अलबेल नाही, हे उघड आहे. युतीचा “बाण’ सुटल्यानंतर खासदार मनोमन खुशीत आहेत. परंतु सध्या उमेदवारी जाहीर झाली नसली तरी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी निश्‍चित मानली जाते. पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्ष शरद पवार यांनी पवारांच्या कुटुंबातून लोकसभेच्या राजकीय मैदानात फक्‍त मी असेल, असे सांगून “यॉर्कर’ टाकला.

एकीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारीचे “लपंडाव’ सुरू असतानाच श्रीरंग बारणे यांना विरोध म्हणून भाजपने (अर्थातच आमदार लक्ष्मण जगताप समर्थक) डावपेच टाकत आहेत. “पालघर’च्या धर्तीवर “मावळ’ हा भाजपला हवाय, याकरिता आमदार जगताप समर्थकांनी एकीचे दर्शन घडविले. आता शिवसेना “हॅट्ट्रिक’ नोंदविण्याच्या तयारीत असली तरी राष्ट्रवादीकडून मात्र सेनेची विकेट घेण्याची तयारी पूर्ण झाली आहे. लोकसभेसाठी उमेदवार राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा असला तरी भाजप आणि शेतकरी कामगार पक्षाची भूमिका मात्र निर्णायक ठरणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल, कर्जत आणि उरण या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. मागील दोन टर्म “मावळ’वर सेनेचे वर्चस्व राहिले. 2009 मध्ये गजानन बाबर आणि 2014 ला श्रीरंग बारणे यांच्या रुपाने सेनेने विजयी पताका रोवली. दोन्ही वेळच्या एकहाती विजयामुळे सेना आता “हॅट्ट्रिक’ नोंदविण्याच्या तयारीत आहे. खासदार श्रीरंग बारणे यांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. आपणच सेनेचा पुढचा खासदार होणार असा आत्मविश्‍वास बारणे वारंवार बोलून दाखवत आहेत. त्यादृष्टीने खासदार बारणे गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात कमालीचा जनसंपर्क वाढविला आहे. परंतू 2009 पेक्षा 2014 मध्ये मोदी लाटेत सेनेच्या उमेदवाराचा मते सात टक्‍क्‍यांनी घटली होती. आता मोदी लाटही नाही आणि सत्तेच्या विरोधात मतदारांचा मिळणारा कौल राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडू शकतो.

मागील दोन टर्म सेनेकडे असलेला “मावळ गड’ खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. पार्थ पवार यांचे पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळातील वाढते दौरे पाहता ते आघाडीचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. पवार कुटुंबियांमधून केवळ मीच लोकसभेचा उमेदवार असेल, अन्य अजित, पार्थ अथवा रोहित असे कोणीही निवडणूक लढविणार नाही, असे सांगून शरद पवार मोकळे झाले. तरीही “मावळ’मधील पार्थ पवार यांच्या गाठभेटी थांबलेल्या नाहीत, हे ही तितकेच खरे आहे. युती झाली आणि लोकसभेसाठी इच्छुक असलेले चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आणि शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसून येत आहे. गतवेळी लक्ष्मण जगताप यांनी शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या (मनसे) पाठिंब्यावर निवडणूक लढविली होती. 2014 चा सामना कमालीचा रंगतदार झाला होता. त्यावेळी सेनेचे श्रीरंग बारणे यांना जगताप यांनी तगडी झुंज दिली होती. या लढाईत श्रीरंग बारणे यांचा एक लाख 57 हजार 394 मतांनी विजय झाला. मागील काही दिवसांच्या घडामोडी पाहता जगताप समर्थक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मावळ भाजपला मिळावा, यासाठी वारंवार साकडे घालत आहेत. युतीनंतरही लक्ष्मण जगताप 2014 च्या पराभवाचे उट्‌टे काढू शकतात. त्यामुळे ते श्रीरंग बारणे यांना मदत करतील, हे सांगायला ज्योतिषी नकोत.

“मावळ’चा मागोवा…
राज्यात सेना-भाजपची युती झाल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला “मावळ’मध्ये विजयाची संधी आहे, असा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून तगड्या उमेदवाराची चाचपणी सुरू असली तरी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब होईल, अशी चर्चा आहे. मागील टर्मला शिवसेनेतून बाहेर पडलेले राहुल नार्वेकर यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली. अखेर नार्वेकर बळीचा बकरा ठरले. त्यावेळी श्रीरंग बारणे (सेना), लक्ष्मण जगताप (शेकाप) आणि राहुल नार्वेकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस) यांच्यात प्रमुख लढत झाली. अन्य उमेदवार नावापुरते दिसले. राष्ट्रवादीला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यामुळे यावेळी “घरचा’ उमेदवार देण्याची तयारी राष्ट्रवादीने सुरू केली आहे. या चर्चेत पार्थ पवार यांचे नाव आघाडीवर दिसते. एकंदरीतच शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी “मावळ’ची लढत सोपी राहिली नाही. हे ही तितकेच खरे आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड व मावळ आणि रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आहे. घाटाखालच्या उमेदवारापेक्षा (पनवेल, उरण, कर्जत) घाटावरील (पिंपरी, चिंचवड, मावळ) उमेदवाराला पसंती देतील, अशी सद्यस्थिती आहे.

…अशी आहे मतदारसंघातील स्थिती
मावळ लोकसभेचा विधानसभानिहाय आढावा घेतला तर चिंचवड (लक्ष्मण जगताप), मावळ (बाळा भेगडे), पनवेल (प्रशांत ठाकूर) हे भाजपचे आमदार आहेत. कर्जतमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुरेश लाड, पिंपरी आणि उरणमध्ये सेनेचे अनुक्रमे ऍड. गौतम चाबुकस्वार आणि मनोहर भोईर आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसाठी अस्तित्त्वाची लढाई मानली जात आहे. तर दुसरीकडे सेनेचा विजयी अश्‍वमेध रोखण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेसला चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या कोणत्याही एका पक्षाच्या छताखाली नाही. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) या प्रत्येकाचे स्वतंत्र अस्तित्व असलेला मतदारसंघ आहे. विरोधकांच्या मत विभाजनामुळेच मागील दोन टर्म शिवसेना वरचढ ठरली आहे. 2014 मध्ये लक्ष्मण जगताप यांनी शेकाप-मनसेच्या पाठिंब्यावर लोकसभा निवडणूक लढविली होती. युती झाली असली तरी जगताप समर्थक हे त्यांनी लोकसभा लढवावी, म्हणून प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

“छुप्या आघाडी’ निर्णायक ठरणार
2014 मध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांनी बंडाचा झेंडा फडकावत शेतकरी कामगार पक्षाची उमेदवारी मिळवली शिवाय मनसेचा पाठींबाही मिळविला होता. दरम्यानच्या काळात “शेकाप’काडून लढलेले जगताप यांनी भाजपची वाट धरली. त्यात ते चिंचवडचे आमदार झाले. सध्या जगताप आणि बारणे यांच्यात टोकाचे वैर दिसते. त्यामुळे मावळमधून पार्थ पवार यांनी राजकारणात “एन्ट्री’ करण्याचा चंग बांधला आहे. शिवसेना-भाजपची झालेली युती पाहता लक्ष्मण जगताप, शेकापचे जयंत पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात “छुपी अथवा उघड आघाडी’ झाल्यास युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना चांगलाच घाम गाळावा लागेल, हे उघड आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)