योगदिनी अभूतपूर्व उत्साह

सुदृढ आरोग्यासाठी रोज योगसाधना करावी : प्रा. शिंदे

नगर – पाचवा आंतरराष्ट्रीय योगदिन देश-विदेशात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना संपूर्ण जिल्हावासीयांनी यात सहभाग नोंदवून अभूतपूर्व प्रतिसाद दिला. जिल्हा क्रीडा संकुलातील मुख्य कार्यक्रमाबरोबरच तालुकास्तरावरील कार्यक्रम आणि प्रत्येक शाळांमध्ये झालेल्या कार्यक्रमात 14 लाखांहून अधिक विद्यार्थी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी, नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी मुख्य कार्यक्रमात सहभाग नोंदवत उपस्थितांना प्रोत्साहन दिले. योग हा सुदृढ आरोग्यासाठी आवश्‍यक असून नागरिकांना दररोज योग करावा, असे आवाहन त्यांनी केले.

21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. राज्य शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागासह अन्य सर्वच विभाग या उपक्रमात सहभागी झाले होते. पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्यासह आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, उपमहापौर मालन ढोणे, माजी खासदार दिलीप गांधी, एन. एस. सुब्बाराव आदींची यावेळी उपस्थिती होती.

सकाळी सहा वाजल्यापासूनच शालेय विद्यार्थी आणि नागरिकांची पावले क्रीडा संकुलाच्या दिशेने वळू लागली होती. प्रत्येकाच्या अंगात उत्साह संचारला होता. जवळपास 27 हजार शालेय विद्यार्थी व नागरिकांनी सामूहिक योगसाधना केली. आपल्या सुदृढ आरोग्यासाठी योगसाधना गरजेची आहे,मन आणि शरीराची जोपासना करण्यासाठी योग महत्वाचा असल्याचे महापौर वाकळे यांनी केले. तर सुब्बाराव यांनी गीताच्या माध्यमातून उपस्थितांना प्रोत्साहित केले.

सव्वा सात वाजता या सामूहिक योगसाधनेस सुरुवात झाली. महावीरनगर मल्लखांब व योगा ट्रेनिंग सेंटरच्या प्रणिता तरोटे, जिल्हा योग संघटनेचे उमेश झोटिंग, इंडियन नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनच्या प्रेरणा नांबरिया, श्रीनिवास नांबरिया, पतंजलीचे अविनाश ठोकळ, मनीषा लोखंडे, अंजली गांधी आणि आर्ट ऑफ लिव्हींगचे महेंद्र शिंदे या योगशिक्षकांनी उपस्थितांकडून योग प्रात्यक्षिके करून घेतली.

जिल्हास्तरावर झालेल्या या उपक्रमात विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी तसेच शहरी शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, शासकीय तंत्रनिकेतन, मनपा शिक्षण मंडळ, नेहरू युवा केंद्र, जिल्हा योग संघटना, अहमदनगर एज्युकेशन सोसायटी, एम. एम. वाय. टी. सी., जिजाऊ हास्य क्‍लब, जिल्हा मैदानी खेळ संघटना ,रोटरी क्‍लब, लायन्स क्‍लब, मॅक्‍सीमस स्पोर्टसक्‍लब, योगशिक्षक, आर्ट ऑफ लिव्हींग आदि संस्थांचे पदाधिकारी तसेच कर्मचारी, खेळाडू, कलाकार, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.

सुमारे चाळीस मिनिटांच्या सामूहिक योग कार्यक्रमामध्ये प्रार्थना, पूरक हालचाली, विविध आसने, प्राणायाम, ध्यानधारणा व ओंकार, संकल्प आणि प्रार्थना आदी कृती कार्यक्रम योगशिक्षकांनी करुन दाखवले. जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्या संकल्पनेतून क्रीडासंकुलावर उभारलेल्या सेल्फी पॉईंटलाही योगसाधकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. क्रीडा अधिकारी दीपाली बोडके आणि नंदकिशोर रासने, क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरंगे आणि विशाल गर्जे यांच्यासह गौरव परदेशी यांनी विविध क्रीडा संस्था व संघटनांच्या सहकार्याने या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)