अर्धमत्स्येंद्रासन (मधुमेहींना वरदान-शर्करा नियंत्रण करण्यासाठी)

मधुमेहींना वरदान शर्करा नियंत्रण करणारे नियमित करावयाचे आसन- अर्धमत्स्येंद्रासन

-डाॅ. अरविंद कुलकर्णी 

हे बैठक स्थितीतील एक आसन आहे. महादेवाचे शिष्य मत्स्येंद्रनाथ स्वामी यांनी या आसनाचा शोध लावला म्हणून त्यांच्या नावाचे हे आसन आहे.

-Ads-

उजवा पाय गुडघ्यात दुमडून त्या पायाची टाच शिवणीस घट्ट रोवून ठेवावी. टाच हलू देऊ नका. नंतर डावा पाय गुडघ्यात वाकवा व डाव्या पायाचा घोटा उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ येईल अशा प्रकारे ठेवा. उभ्या वाकलेल्या डाव्या गुडघ्यावर उजव्या हाताची बगल टेकवा. नंतर गुडघा असा मागे सरकवा की त्याचा स्पर्श बगलेच्या मागील भागाला होईल.

आता उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडा. नंतर उजव्या खांद्याच्या सांध्यावर भार देऊन पाठीचा कणा विरूध्द बाजूला म्हणजे डाव्या बाजूला वळवा. चेहरा शक्‍यतो डाव्या खांद्याच्या रेषेत आणा. या आसनामुळे पाठीचा कणा धुणं पिळल्यासारखा दोन्ही अंगांनी पिळवटला जाऊन बळकट होतो.

हे आसन दोन्ही बाजूंनी करावे. पोटाच्या सर्व स्नायूंना आणि शरीराच्या सर्व अवयवांना ह्या आसनामुळे व्यायाम होतो.
जठराग्नि प्रदीप्त होऊन पचनक्रिया सुधारते.

हे आसन करताना विशेष काळजी घ्यावी. म्हणजे चेहरा डाव्या खांद्याच्या आणि उजव्या खांद्याच्या रेषेतच हवा. या आसनामुळे पाठीच्या कण्याला भरपूर व्यायाम मिळतो. कुंडलिनी शक्ती जागृत होते. म्हणजेच कुंडलिनी शक्ती जागृत करुन ती चंद्रनाडीला स्थिर करता येते. तसेच पोटातील सर्व स्नायूंना व्यायाम मिळतो. आतिरक्त चरबीची अंशत: घट होते. हातापायांचे स्नायू बळकट होतात. पाठीच्या कण्याच्या मूलभागी बळकटी येते. तसेच तेथील रक्ताभिसरण सुधारते.

मधुमेहींनी हे आसन रोज केल्यास त्यांची शर्करा नियंत्रित राहते. गुडघा, पोटऱ्या, घोटे येथील कार्य सुधारायला मदत होते. पुरुषांचे वीर्यविकार दूर होतात. स्त्रियांचे गर्भौशयाचे रोग दूर होण्यास मदत होते. हे आसन करताना मान सरळ ठेवावी लक्ष अनाहत चक्रावर केंद्रीत करावी. हृदय बलवान होण्यासाठी व यकृत आणि फुफ्फूसाचे कार्य योग्यप्रकारे होण्यासाठी हे आसन नियमित करावे. पाठीच्या कण्यावर आपले जीवन अवलंबून असते. त्या कण्याचे कार्य सतत व उत्तम प्रकारे चालावे म्हणून हे आसन उपयुक्त ठरते.

मुत्रदाह आणि कंबर दुखीसारख्या विकारांवर अर्धमत्स्येंद्रासन केल्याने नक्‍कीच फायदा होतो. स्नायू कार्यक्षम होतात. थोडक्‍यात स्नायू संस्था प्रभावीपणे कार्य करु लागतात. योगसिद्धी पुरुष या आसनात बराच काल बसू शकतात. पण जास्त ताण न घेता आपण मात्र पाच ते पंधरा सेकंदापर्यंत हे आसन करावे.

काही मधुमेहींना पोटाच्या घेरामुळे हे आसन करता येत नाही अशावेळी त्यांनी उजवा हात डाव्या मांडीच्या पलीकडे जास्तीत जास्त न्यावा. डावा हात कमरेला लपेटून डाव्या खांद्याच्या पलिकडे पहावे तसेच डावा हात उजव्या मांडीच्या पलिकडे न्यावा आणि उजवा हात कमरेला लपेटून उजव्या खांद्याच्या पलिकडे पहाण्याचा प्रयत्न करावा.

हेही जमले नाही तर पाय फक्त गुडघ्यात दुमडून अनुक्रमे डावा आणि उजवा पाय जवळ घेऊन विरुद्ध हात त्या पायाच्या पलिकडे न्यावा. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी अर्धमत्स्येंद्रासन रोज नियमितपणे वीस सेकंद तज्ञ योगशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली टिकवावे. यामुळे साखर नियंत्रणात राहते. नैसर्गिकपणे इन्शुलिन तयार व्हायला मदत होते म्हणूनच मधुमेहींना हे आसन वरदान आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)