योग दिन उत्साहात; खा. उदयनराजे भोसले यांचीही उपस्थिती

विद्यार्थ्यांसह अधिकारी अन्‌ नागरिकांनी केला योगा

सातारा- पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात उत्साहात संपन्न झाला. यंदाच्या योग दिनाला खा. उदयनराजे आवर्जून उपस्थित राहिले. त्याचबरोबर जिल्ह्यातील प्राथमिक शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्थांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात हजारो विद्यार्थी, नागरिक आणि अधिकाऱ्यांनी योगा केला. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे पाचवे वर्ष असून दरवर्षी योगा करणाऱ्यांची संख्या वाढत असून त्यानिमित्ताने योगाचा प्रसार झपाट्याने होत आहे.

सातारा शहरात शाहू स्टेडियम येथे आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमास खा. उदयनराजे, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांच्यासह खोतप्रमुख उपस्थित राहिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकारी व विद्यार्थ्यांनी
योगा केला.

यावेळी बोलताना खा. उदयनराजे म्हणाले, आपल्या जीवन शैलीमुळे आयुष्यमान कमी होत चालले आहे. निरोगी आयुष्यासाठी व आयुष्यमान वाढविण्यासाठी प्रत्येकाने योगासने केला पाहिजेत. शक्ती आणि युक्तीची सांगड घातली तर माणूस निरोगी राहू शकतो व निरोगी आयुष्यामुळे ठरवलेले ध्येय गाठू शकतो यासाठी प्रत्येकाने आपल्या दिवसाची सुरुवात योगाने करावी, असे सांगून खासदार उदयनराजे भोसले यांनी योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल म्हणाल्या, प्रत्येकाने दिवसाची सुरुवात ही व्यायामाने केली पाहिजे. कमीत कमी दररोज 20 मिनिटे रोज चालण्याचा व्यायाम तरी केला पाहिजे. शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रत्येकाने योग केला पाहिजे. यामुळे ताण-ताणव तर कमीच होतोच आपले आरोग्यही चांगल्या पद्धतीने राहते. मुलांनी अभ्यासाबरोबर शारीरिक व्यायामालाही महत्त्व दिले पाहिजे. योगामुळे मानसिक विकास होते. यासाठी प्रत्येकाने योग जीवनाचा अविभाज्य घटक बनवा, असे सांगून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी विविध योगा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित योगाची आसने करण्यात आली. याप्रसंगी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात योग कार्यशाळा उत्साहात

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात योगाबाबत कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेस उपजिल्हाधिकारी विद्युत वरखडकर, तहसीलदार सोनीया घुगे, वैशाली राजमाने यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आर्ट ऑफ लिव्हिंगचे सुनील पोतदार, संजय खटावकर यांनी प्रशासकीय काम करत असताना योगासनाच्या माध्यमातून ताण-तणावापासून कसे दूर राहता येईल व योगाचे महत्त्व सांगून योगासनाचे प्रात्यक्षिकेही यावेळी करून दाखविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)