पुणे – येरवडा मनोरुग्णालयात बिबट्याचा वावर?

संग्रहित छायाचित्र...

विश्रांतवाडी – केशवनगर परिसरात बिबट्या सापडल्याची घटना ताजी असताना येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात बिबट्याने शनिवारी रात्री प्रवेश केल्याचे दिसून आले. याबाबत माहिती मिळताच रुग्णालयात भितीचे वातावरण पसरले होते. बिबट्याच्या दहशतीमुळे रुग्णालयातील रुग्णांना वार्डातून बाहेर सोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. वन विभागाच्या वतीने रविवारी व सोमवारी रुग्णालय परिसराची पाहणी करण्यात आली. त्यासोबतच प्राणीमित्रांकडून रुग्णालयाच्या परिसरात बिबट्याचा आणि त्याच्या ठसांचा शोध घेण्यात आला.

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात शनिवारी रात्री अकराच्या सुमारास बिबट्याला काही कर्मचाऱ्यांनी आणि रुग्णांनी पाहिले. त्यांनी तत्काळ प्रशासनाला माहिती दिली. खबरदारी म्हणून कर्मचाऱ्यांना रात्री रुग्णांवर लक्ष देण्यास सांगण्यात आले. रविवारी सकाळपासूनच विविध वार्डातील रुग्णांना बाहेर सोडण्यात येऊ नये, असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले होते.

मनोरुग्णालयातील महिला वार्डातील बंद अवस्थेत असलेल्या “ऐश्वर्या’वार्डाच्या परिसरात असलेल्या झुडपांमध्ये बिबट्या लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे रविवार सुट्टीचा दिवस असूनही उप अधीक्षक मधु पाटील रुग्णालयात येऊन रुग्णांच्या सुरक्षेचा आढावा घेत होते. मनोरुग्णालयात बिबट्या असल्याचा संशय आल्याने पाटील यांनी वन विभागाला कळविले. रविवारी दुपारी वन विभागाच्या एका कर्मचाऱ्याने रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. सोमवारी(दि.11) वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पुन्हा भेट देऊन बिबट्याचा शोध घेतला. परंतु, अद्याप बिबट्या रुग्णालय परिसरात असल्याबाबत काहीच पुरावा सापडला नाही. रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करत दक्षता घेण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना अधीक्षक डॉ. अभिजीत फडणीस म्हणाले की, मनोरुग्णालयात बिबट्याने प्रवेश केल्याची माहिती प्रशासनाला शनिवारी रात्री समजताच रुग्णांना वार्डबाहेर न सोडण्याबाबत सूचना करण्यात आली. तसेच याबाबत वन विभागालाही तत्काळ कळविण्यात आले. वन विभागाच्या वतीने रुग्णालय परिसराची पाहणी करण्यात आली आहे. मनोरुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रीकरणही तपासण्यात आले. पण, अद्याप बिबट्याचा वावर असल्याचा काहीही पुरावा सापडून आलेला नाही. सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालयाच्या परिसरात अधिकची प्रकाशव्यवस्था केली असून प्रशासनाकडून संपूर्ण दक्षता घेण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)