…तर 1975 पेक्षाही कठीण संघर्ष करावा लागणार

माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची मोदी सरकारवर टीका

पुणे – आजच्या काळात देशात अघोषित आणीबाणी लादण्यात आली आहे. संसदीय यंत्रणा, सुरक्षाविषयक संस्था, न्यायालय, निवडणूक आयोग याचा सरकारने ताबा घेतला आहे. एका भीतीच्या दडपणाखाली सर्वांना ठेवले जात आहे. हे सर्व समजविण्यासाठी सन 1975 पेक्षाही कठीण संघर्ष करावा लागणार आहे, अशा शब्दांत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारवर टीका केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

क्रांती दिन आणि युवक क्रांती दलाच्या 17 व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोतपल्ले, डॉ. कुमार सप्तर्षी तसेच अप्पा अनारसे, सचिन पांडुळे, जांबुवंत मनोहर, सुदर्शन चखाले, रवींद्र धनक,रवी लाटे उपस्थित होते.

सिन्हा म्हणाले, इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीच्या निर्णयानंतर घटनादुरूस्ती करण्यात आली. त्यानुसार पंतप्रधानाला आणीबाणीची घोषणा करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र सध्या अत्यंत चतुराईने अघोषित आणीबाणी राबविली जात आहे. संसदीय व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, माध्यमे , न्यायालय, ताब्यात घेऊन त्यांना स्वत:प्रमाणे नाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आताच्या आणीबाणीत सांप्रदायिकता असून, अनेक व्यवस्थांची शरण गेल्यासारखी अवस्था झाली आहे.

कॅबिनेट मंत्रिमंडळावरही सिन्हा यांनी ताशेरे ओढले. ते म्हणाले, पंतप्रधानाचा दर्जा असा असतो की, त्याच्यासाठी सर्व समान आहेत. मात्र मंत्रिमंडळातील क्रमांक दोनच्या मंत्र्याला म्हणजे केंद्रीय गृहमंत्र्याला मेहबुबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढल्याची माहिती नव्हती. नागा विषयक कराराची माहितीही गृहमंत्र्याला दिली गेली नाही. परराष्ट्रमंत्र्यांना परदेश दौऱ्यात, कामकाजात सामावून घेतले जात नाही. त्यांचे अशोभनीय भाषेत ट्रोलिंग केले जाते. अर्थमंत्र्यांना नोटाबंदीच्या निर्णयाची माहिती नव्हती. राफेल निर्णयाची माहितीपासून संरक्षण मंत्री अनभिज्ञ होते. कॅबिनेट व्यवस्था ‘ग्रुप ऑफ ऑर्डर्ली’ झाली आहे. एकच जण निर्णय घेत आहे, त्याचे श्रेय-अपश्रेय घेत आहेत.

डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, देशात फॅसिस्ट राजवट असल्यासारखे वातावरण आहे. अशावेळी सत्याग्रहाच्या मार्गाने लढले पाहिजे. हे केंद्रातील सरकार गेले पाहिजे, या भूमिकेपर्यंत आम्ही आलो आहोत. कॉंग्रेसला भाजपविरोधी लढाई पेलवत नसेल, तर सर्व भाजपविरोधी विचारांनी एकत्र यायला हवे.

डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. “युक्रांद’ चे सचिव संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, युवक क्रांती दल आणि प्रफुल्लता प्रकाशन यांच्या वतीने “युक्रांद’चे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी लिखित ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी ते बोलत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)