यशवंत सिन्हांनी मांडला मोदींच्या अपयशाचा पाढा

मोदी अनमेड इंडिया नावाचे स्वतंत्र पुस्तकच केले प्रकाशित

नवी दिल्ली: भाजपतून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारच्या गैव्यवहारांचा आणि गलथानपणाचा पाढा वाचण्यासाठी एक स्वतंत्र पुस्तकच प्रकाशित केले आहे. जीडीपीच्या आकड्यांमध्ये या सरकारने सातत्याने घोळ केला आहे, आरबीआयची स्वायतत्ता कधी नव्हे इतकी धोक्‍यात आली आहे, आणि नोटबंदी हा सर्वात मोठा बॅंकिंग घोटाळा आहे असे आरोप त्यांनी प्रामुख्याने या पुस्तकात केले आहेत. मोदींना देशाची अर्थिक व्यवस्था नव्या उंचीवर नेण्याची संधी होती ती त्यांनी साफ गमावली आहे असा निष्कर्षही त्यांनी यात काढला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोदी अनमेड इंडिया असे त्यांच्या या पुस्तकाचे नाव आहे. त्यांनी यात मोदींनी देशाच्या अर्थव्यवस्थेची कशी पद्धतशीर वाट लावली आहे याचा सारा तपशील मांडला आहे. आपण मोदींचे व्यक्तीगत विरोधक नाही किंवा त्यांनी आपल्याला मंत्रिपद दिले नाही किंवा आणखी कोणते पद दिले नाही या विषयी आपण त्यांच्यावर नाराज नाही. उलट मोदींमधील गुणवत्ता आपल्या खूप आधीच लक्षात आली होती आणि त्यांनाच पंतप्रधानपदाचे उमेदवार केले पाहिजे अशी मागणी मी सन 2014 च्या निवडणूकीत केली होती असेही त्यांनी नमूद केले.

त्यांनी म्हटले आहे की नोटबंदी हा विक्षिप्तपणाचा निर्णय होता. त्यातून काहीही साध्य होणार नव्हते आणि त्यानुसार काहीही साध्य झालेले नाही. आपण धनदांडग्यांच्या विरोधात कठोर उपाययोजना करीत आहोत असे भासवून त्याचा राजकीय लाभ घेण्याची संधी मात्र त्यांना या निर्णयामुळे लाभली आणि सन 2017 च्या उत्तरप्रदेश निवडणुकीत त्यांना याचा मोठाच राजकीय लाभ झाला असे ते म्हणाले. नोटबंदी कशासाठी केली याविषयी सरकारने विशेषत: अरूण जेटली यांनी वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगितली. असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले. मोदींच्या फ्लॅगशिप योजना म्हणून ज्यांचा उल्लेख केला त्याही पुर्णपणे फसल्या असे सांगताना त्यांनी मेक ईन इंडियाचे उदाहरण दिले. मोदींनी रोजगार म्हणून लोकांना भजी विकणे, रिक्षा चालवणे, चहाचा स्टॉल लावणे, वृत्तपत्रे विकणे असे व्यवसाय सांगितले. पण रोजगार किंवा नोकरी मागणारा कोणीही अशा प्रकारचे व्यवसाय करण्याची अपेक्षा धरीत नाही असे ते म्हणाले.

कोणत्याही आर्थिक उलाढाली शिवाय इतका विकास दर कसा?
मोदी सरकारच्या विकास दराच्या दाव्यांची सिन्हा यांनी या पुस्तकात चांगलीच पोलखोल केली आहे. त्यांनी यात उपरोधिकपणे म्हटले आहे की भारत हा जगातील एकमेव असा देश आहे की जो कोणत्याही गुंतवणुकीशिवाय, औद्योगिक विकास वाढीशिवाय किंवा कृषी क्षेत्राच्या विकासाशिवाय 7.35 टक्के इतका विकास दर कायम राखू शकतो. ही केवळ जादू असून अशी जादू करणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरला आहे असे त्यांनी म्हटले आहे. या सरकारने जीएसटीचाही असाच बट्‌य्याबोळ केला असून चारशे अधिसूचना आणि शंभर परिपत्रके काढून एका चांगल्या संकल्पनेची मोदी-जेटलींनी वाट लावली असेही त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)