जागतिक वन दिन : वनसंवर्धनासमोर वणवे, अतिक्रमणांचे आव्हान

पुणे – वृक्ष लागवडीची मोहीम, तंत्रज्ञानाचा वाढता वापर, नागरिकांमध्ये होणारी जागरूकता अशा सर्व सकारात्मक गोष्टींमुळे वनसंवर्धनाला चालना मिळत असली, तरी सातत्याने पेटणारे वणवे आणि वनजमिनींवरील अतिक्रमणे हे वन संवर्धनासमोर मोठे आव्हान उभे आहे. हे आव्हान थोपविण्यासाठी वनविभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असले, तरी अजूनही यामध्ये फारसे यश मिळत नसल्याचे चित्र समोर येत आहे.

वनविभागाच्या पुणे सर्कलअंतर्गत पुणे, दौंड, इंदापूर, बारामती आणि जुन्नर असे पाच तालुके समाविष्ट आहेत. सुमारे 2 हजार हेक्‍टर राखीव वनजमिनी असलेल्या पुणे विभागात वनजमिनींवरील अतिक्रमण आणि वन क्षेत्रात वारंवार पेटणारे वणवे ही चिंतेची बाब बनली आहे. भारतीय वनसर्वेक्षण संस्थेनुसार, जानेवारी ते मार्चदरम्यान राज्यात तब्बल 3,528 वणव्यांची तर एकट्या पुणे विभागात (डोणजे, खेड शिवापूर, कोंढणपूर, नांदोशी परिसर) 35 आगीच्या घटनांची नोंद झाली आहे. या वणव्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातात. यामध्ये वनक्षेत्रांचे नकाशे तयार करणे, सातत्याने आगी लागणाऱ्या ठिकाणांचा अभ्यास करून कारणे आणि उपाय शोधणे, वणवा विझविण्यासाठी आवश्‍यक यंत्रणेची उभारणी असे विविध उपाय केले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र वणव्यांचे आव्हान रोखण्यात विभागाला अद्यापही फारसे यश मिळविता आले नाही.

पुणे वनविभागाचे सहायक उपवनसंरक्षक महेश भावसार म्हणाले,”उन्हाळ्यामुळे वाढणारे वणवे आणि वनजमिनीवरील अतिक्रमण हे सध्या वनविभागासमोरील महत्वाचे आव्हान आहे. शहरी भागात जमिनींच्या वाढत्या किमतींमुळे रिकाम्या पडलेल्या वनजमिनींवर अतिक्रमण करण्यासाठी लोकांकडून प्रयत्न केले जातात. अशा अतिक्रमणांना हटवून त्या जमिनीभोवती सीमाभिंती बांधण्याचे काम सध्या विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणी वृक्षारोपणही केले जात आहे.’

वनजमिनींवरील अतिक्रमणे ही देखील वनविभागाची डोकेदुखी ठरत आहे. वैयक्तिक अथवा सामूहिकरीत्या वनजमिनींवर केले जाणारे अतिक्रमण, त्या अतिक्रमणांची पडताळणी, त्यानंतर वनजमिनींची सुटका आणि जमिनींचे संरक्षण असे चक्र सध्या सुरू असून, वन संवर्धनासाठी वनजमिनींची अतिक्रमणातून मुक्तता ही मुख्य उद्दिष्ट्ये आहेत.
– महेश भावसार, सहायक उपवनसंरक्षक, पुणे वनविभाग.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)