#ICCWorldCup2019 : विश्‍वचषक उद्‌घाटन सोहळा संपन्न

लंडन – संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या 12 व्या विश्‍वचषक स्पर्धेचा उद्‌घाटन सोहळा गुरूवारी (दि. 30 रोजी) बकिंगहॅम येथील लंडन मॉलमध्ये पार पडला. या सोहळ्यात क्रिकेटप्रेमींचा एकच जल्लोष पाहायला मिळाला. या सोहळ्याला क्रिकेटजगतातील नामवंत खेळाडू, क्रिकेटप्रेमींसह इंग्लंडचे शाही घराणेही उपस्थित होते.

विश्‍वचषकासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा उद्‌घाटन किंवा समारोप सोहळा म्हणजे कलाकारांची अदाकारी आणि नवनवीन कलाविष्कारांची मेजवानी किंवा एखाद्या मैदानामध्ये होणारा भव्य सोहळा समीकरण असते. पण या समीकरणाला छेद देत मध्य लंडनमधील बकिंगहॅम पॅलेससमोरील द मॉल येथे संपन्न झालेल्या “आयसीसी’ विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्याने मात्र अनेकांची निराशा झाली.

रस्त्यावर एखाद्या पथनाट्याप्रमाणे झालेल्या या कार्यक्रमाने चाहते नाराज झाल्याचे दिसून आले. सकाळी साडेनऊ वाजता विश्‍वचषक उद्‌घाटनाचा सोहळा सुरू झाला. यावेळी विविध देशांतील क्रिकेटप्रेमींनी एकच गर्दी केली होती. यावेळी ही गर्दी आवरताना सुरक्षा रक्षकांचीही दमछाक उडाली.

इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्य्रू फ्लिंटॉफ, हास्यकलाकार पॅडी मॅकगिनिज आणि शिबानी दांडेकर यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. उद्‌घाटन सोहळ्याच्या सुरुवातीला दहाही संघाच्या कर्णधारांना स्टेजवर पाचारण करण्यात आले होते यावेळी महाराणी एलिझाबेथ आणि प्रिन्स हॅरी यांनी सर्व कर्णधारांची भेट घेत त्यांच्याशी हस्तांदोलनही केले. यानंतर प्रत्येक कर्णधाराने आपले मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमाच्या अखेरीस लॉरिन आणि रुडीमेंटल यांनी रचलेले “स्टॅंड बाय’ हे विश्‍वचषकाचे अधिकृत गाणे सादर केले.

यावेळी वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्डस, भारताचा माजी गोलंदाज अनिल कुंबळे, फरहान अख्तर, श्रीलंकेचा माजी फलंदाज माहेला जयवर्धने, बांगलादेशचा क्रिकेटपटू अब्दुल रज्जाक, पाकिस्तानचा अजहर अली, नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला युसूफजाई, ऑस्ट्रेलियन गोलंदाज ब्रेट ली, जेम्स फ्रॅंकलिन, जॅक कॅलिस आणि केविन पीटरसन आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)