विश्वस्तरीय मल्लखांब स्पर्धा : लाऊड स्पिकर लावण्यास राज्य सरकारचा विरोध

उच्च न्यायालयाचा हस्तक्षेप करण्यास नकार

मुंबई : मुंबईतील शिवाजी पार्क येथे पुढील आठवड्यात रंगणारी पहिली वहिली विश्वस्तरीय मल्लखांब स्पर्धा आयोजकांना लाऊड स्पिकर लावण्यास राज्य सरकारने परवानगी नाकारल्याने त्यात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. यामुळे या स्पर्धा आता आयोजकांना लाऊड स्पिकरशिवाय पार पाडाव्या लागणार आहे.

देशविदेशातील मातब्बर मल्लखांबपटूंना एकत्र आणत विश्व मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने भारतीय मल्लखांब महासंघ आणि श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर यांच्यातर्फे मल्लखांबाची पहिली विश्व अजिंक्‍यपद स्पर्धा दि. 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आली आहे. मात्र शिवाजीपार्क हे शांतताक्षेत्र असल्याने स्पिकर लावण्यास परवानगी मिळावी म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यजमान भारतासह जर्मनी, झेक रिपब्लिक, बांगलादेश, स्पेन, इटली, अमेरिका, इराण, नॉर्वे, इंग्लंड, फ्रान्स, मलेशिया, सिंगापूर, जपान, व्हिएतनाम अशा एकूण 15 देशांचे 150 खेळाडू आणि अधिकारी या स्पर्धेत भाग घेणार आहेत. या स्पर्धेकरता चार ते पाच हजार प्रेक्षक हजेरी लावतील अशी अपेक्षा असल्याने एवढ्या मोठ्या आयोजनासाठी लाउड स्पीकर्स लावण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आली. मात्र राज्य सरकारने जोरदार विरोध केला. शिवाजी पार्क हे शांतताप्रवण क्षेत्र असल्यामुळे इथं लाऊड स्पीकर्स लावता येणार नाहीत, अशी भूमीका घेतली. राज्य सरकारनेच विरोध केल्याने न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार दिला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)