जागतिक पुस्तक दिन विशेष : छापील पुस्तकांमुळेच वाचनाचा ‘फील’

पर्याय उपलब्ध; तरीही तंत्रज्ञानाच्या युगातही भुरळ कायम

– कल्याणी फडके

पुणे – पूर्वी सहज होणारे वाचन इंटरनेटच्या विकासामुळे सध्या वाचक वर्ग आधुनिकतेकडे वळला आहे. पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या कमी होत असल्याची चर्चा सर्वत्र असली, तरीही पुस्तकांची भुरळ कायम आहे. वाचनाचा “फील’ छापील पुस्तकांमुळेच येतो, असे वाचकांचे मत आहे. तरूणांनी पुस्तक वाचनाला पसंती दाखविली असली, तरीही ज्येष्ठ नागरिकांनी मात्र वाचन संस्कृती कमी झाल्याची खंत दैनिक “प्रभात’कडे व्यक्त केली. जागतिक पुस्तक दिनानिमित्त वाचकांच्या नजरेतून घेतलेला आढावा.

अधिकाधिक वाचकांची पसंती छापिल पुस्तक प्रकारांना असल्याने ऑडिओ बुककडे फारसे वाचक वळताना दिसत नाहीत. ई- बुक्‍सची उपलब्धता चांगली असली, तरी वाचन करताना “स्क्रीन’कडे वारंवार पाहण्याने डोळ्यांना अपाय होण्याची शक्‍यता असल्याने अनेक वाचक छापिल पुस्तकांचे वाचन पसंत करतात.

महाराष्ट्राला साहित्य संस्कृतीची मोठी परंपरा आहे. मराठीत दरवर्षी सुमारे 5 हजार पुस्तके प्रकाशित होतात. प्रकाशकदेखील नवीन कल्पना वापरून वाचकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. .प्रतिसाद आणि बदलत्या माध्यमांमुळे या परंपरेमध्ये भर पडत आहे. आत्मचरित्र, ऐतिहासिक, प्रेरणादायी, प्रवासवर्णने, रहस्यमय अशा पुस्तकांकडे वाचकांचा कल वाढला असल्याचे दिसून येत आहे. तर लेखन प्रकारांमध्ये दिवसेंदिवस ललित लेखन, कादंबरीकडे वाचकवर्ग खेचला जात असल्याचे चित्र दिसत आहे.

“ई-बुक्‍स’चा “ट्रेन्ड’
बदलत्या इंटरनेटच्या युगामध्ये ई-बुक्‍सची चलती असल्याचे चित्र दिसत आहे. लेखक आणि वाचक दोघांच्याही सोयीचे हे ई-बुक धावपळीच्या युगात वावरणाऱ्या वाचकांना दिलासा देणारे आहे. ई-बुक्‍सच्या माध्यमातून वाचक स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप आदी साधनांवर “डाऊनलोड’ करुन वाचू शकतात. ई-बुक्‍समुळे वेळेची बचत होते. परवडणाऱ्या किमती, वाढती उपलब्धता, आकर्षक मांडणीमुळे वाचकांची ई-बुक्‍सला पसंती आहे.

पुस्तक आपला सगळ्यांत जवळचा मित्र असतो, असे म्हणणे योग्य ठरेल. एकच पुस्तक आपण वेगवेगळ्या मूडमध्ये वाचू शकतो. पुस्तक दिन ही संकल्पना छान आहे. त्यादिवशी अनेक जण स्टेटस ठेवणार, पुस्तकाबद्दल लिहून फॉरवर्ड करणार, पण दुसऱ्या दिवशी “पहिले पाढे पंचावन्न’. पुढच्या पिढीमध्ये वाचन रुजवायचे असेल, तर वाचन दिन रोज असावा. पुस्तक वाचण्यात मिळणारा आनंद अन्य कोणत्याही गोष्टींमध्ये मिळत नाही.
– वैनायकी कुलकर्णी, पुणे


ज्यांच्याकडे वेळ नाही, अशांसाठी ई-बुक्‍स हा चांगला पर्याय आहे. पुस्तक वाचनाने भाषा समृद्ध होते आणि भाषा जपण्यास मदत होते. किंडलवर अनेक पुस्तके असल्याने तो पर्याय आवडतो. ऑडिओ बुक्‍सच्या बाबतीत सांगायचे तर लेखक ज्या भावनेने लेखन करतो, त्या भावना वाचकांपर्यंत पोहोचतेस असे नाही. वाचक आशयावर विचार करेलच असेही नसतेच. त्यामुळे माझ्या मते, वाचनाचा आनंद आणि समाधान अनुभवायचे असेल छापील पुस्तके हा एकमेव पर्याय आहे.
– सई रत्नपारखी, पुणे


पुस्तकांच्या बदलणाऱ्या प्रकारांपेक्षा छापील पुस्तके वाचायला आवडतात. मला प्रवासवर्णने वाचायला आवडतात. कारण प्रवास वर्णने हा देखील मराठी वाङ्‌मयाचा महत्त्वाचा पैलू आहे. वाचकाला एका ठिकाणी बसून साहित्यिक भाषेमध्ये परिसराचे वर्णन, संस्कृती, परंपरा आदींची माहिती सहजपणे मिळणे हा वेगळा अनुभव असतो. उदा. अरविंद गोखले यांच्या “असाही पाकिस्तान’ आणि “अमेरिकेस पाहावे जाऊन’ या कलाकृती आपण स्वत: तिथे आहोत, अशी अनुभूती देऊन जातात.
– रत्नदीप शिंदे, पुणे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)