जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : यामागुचीवर मात करून सिंधू अंतिम फेरीत

अंतिम फेरीत मेरिनचे आव्हान

नानजिंग: भारताची ऑलिम्पिक रौप्यविजेती पी. व्ही. सिंधूने जपानच्या द्वितीय मानांकित आकाने यामागुचीची कडवी झुंज कमालीच्या प्रखर संघर्षानंतर मोडून काढताना जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या उपान्त्य फेरीत दुसऱ्यांदा धडक मारली. विजेतेपदासाठी उद्या (रविवार) रंगणाऱ्या अंतिम लढतीत सिंधूसमोर स्पेनच्या ऑलिम्पिक विजेत्या कॅरोलिना मेरिनचे आव्हान आहे. पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी चीनचा तृतीय मानांकित शि युकी आणि जपानचा सहावा मानांकित केन्टो मोमोटा यांच्यात अंतिम झुंज रंगणार आहे.

उपान्त्यपूर्व फेरीत जपानच्या आठव्या मानांकित नोझोमी ओकुहाराची झुंज मोडून काढणाऱ्या तृतीय मानांकित सिंधूने दुसऱ्या उपान्त्य लढतीत यामागुचीचे आव्हान 21-16, 24-22 असे 55 मिनिटांच्या झुंजीनंतर संपुष्टात आणताना अंतिम फेरीत धडक मारली. या विजयामुळे सिंधूने ऑल इंग्लंड स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत यामागुचीविरुद्ध पत्कराव्या लागलेल्या पराभवाची परतफेड केली. त्याआधी पहिल्या उपान्त्य सामन्यात सातव्या मानांकित कॅरोलिना मेरिनने चीनच्या सहाव्या मानांकित हे बिंगजियावचा प्रतिकार 13-21, 21-16, 21-13 असा 69 मिनिटांच्या लढतीनंतर मोडून काढत अंतिम फेरीतील स्थान निश्‍चित केले.

सिंधू व मेरिन यांच्यातील ही लढत म्हणजे रिओ ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकाच्या लढतीची पुनरावृत्ती ठरेल. त्या अंतिम सामन्यात कॅरोलिना मेरिनने सिंधूची जबरदस्त झुंज मोडून काढताना ऑलिम्पिक सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. या पराभवाची परतफेड करण्याची सिंधूला उद्या संधी आहे. ऑलिम्पिकनंतर एका स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूने मेरिनला पराभूत केले होते. परंतु या दोघींमधील लढतीत मेरिन आघाडीवर आहे.

त्याआधी रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या आणि दोन वेळच्या माजी जगज्जेत्या कॅरोलिना मेरिनने तिसऱ्या फेरीत जपानच्या 15व्या मानांकित सायाका सातोला पराभूत केले होते. तर उपान्त्यपूर्व फेरीत तिने भारताच्या सायना नेहवालचे आव्हान संपुष्टात आणले होते. तर सहाव्या मानांकित हे बिंगजियावने महिला एकेरीतील सर्वाधिक खळबळजनक निकालाची नोंद करताना तैपेई चीनच्या अग्रमानांकित तेई त्झु यिंग हिच्यावर आश्‍चर्यकारक विजय मिळवीत उपान्त्य फेरी गाठली होती.

तत्पूर्वी सिंधूने यामागुचीविरुद्ध पहिली गेम 21-16 अशी जिंकताना सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली होती. परंतु ऑल इंग्लंड स्पर्धेतील उपान्त्य फेरीतही यामागुचीविरुद्ध पहिली गेम जिंकल्यावर सिंधू 21-19, 19-21, 18-21 अशी पराभूत झाली होती. त्यामुळे भारतीय पाठीराख्यांच्या मनावर दडपण होते. दुसऱ्या गेममध्ये यामागुचीने 11-7 अशी आघाडी घेत सिंधूवर दडपण आणले. सिंधूने निकराचा प्रयत्न करूनही तिला ही आघाडी तोडता येत नव्हती.

परंतु यामागुचीच्या एका चुकीचा फायदा घेत सिंधूने 13-19 अशी तिची सर्व्हिस ब्रेक केली आणि तोच या गेमचा टर्निंग पॉइंट ठरला. सिंधूने लवकरच 17-19 अशी पिछाडी भरून काढली. इतकेच नव्हे तर यामागुचीच्या नाहक चुकीचा फायदा घेत 21-21 व 22-22 अशी बरोबरी साधली. यामागुचीने केलेल्या आणखी एका चुकीचा फायदा घेत सिंधूने 23-22 अशी आघाडी घेतली व अखेरच्या फटक्‍यावर शटल नेटला लागून पडल्याने यामागुचीला संधीच मिळाली नाही व सिंधूने हात उंचावीत विजय साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)