कामावर जातानाचा अपघात नुकसानभरपाईस पात्र

सैन्यदलातील जवानांना दिलासा देणारा निकाल

सर्वोच्च न्यायालयाने विविध खटल्यांचा संदर्भ देत 22 जानेवारी 2019 रोजी “लिलाबाई व इतर विरुद्ध सीमा चौहान “या अपिलात अतिशय महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. ड्युटी संपवून बसच्या छतावर जेवण करून उतरताना चालकाचा झालेला मृत्यू “ऑन ड्युटी नोकरी”च्या कक्षेतील मृत्यू मानून नुकसानभरपाईस त्याचे कुटुंबीय पात्र आहे असे जाहीर केले होते. आता नोकरवर्गाला आणखी दिलासा देणारा एक महत्त्वपूर्ण निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामधे सुट्टीवरून नोकरीवर परत जाणारा सैनिक अपघातात मृत्यू झाला तरीही तो ऑन ड्युटी मृत्यू गृहीत धरावा व त्याच्या पत्नीला पेन्शन व इतर नुकसानभरपाई द्यावी असा आदेश दिला आहे.

सदर खटल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरिक्षक राकेश कुमार याला 17 फेब्रुवारी 105 ला सरकारी सुट्टी असल्याने 16 फेब्रुवारीला त्याला लागून एक दिवसाची “कॅज्युअल लिव्ह” (छोटी सुट्टी) मिळाली. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जम्मू येथील हेडक्वार्टरवर कार्यरत असलेला हा जवान 15 फेब्रुवारीला संध्याकाळी हरियाणा येथील नारनौल गावी पोहोचला. त्यानंतर त्याने पत्नीला सांगितले की जरी मला दोन दिवसांची सुट्टी असली तरी धुक्‍याच्या कारणाने रेल्वे उशिरा पोहोचत असल्याने मला एक दिवस अगोदरच निघावे लागेल. त्यानुसार तो जवान दिल्लीमार्गे जम्मूला जाणार होता. जम्मूला जाण्यासाठी जवळचा म्हणून अनेक जण या गावाचा पर्याय निवडतात. दरम्यान तो खातोली गावात जात असताना संध्याकाळी जवानाच्या मोटारसायकलला पाठीमागून येऊन ट्रकने धडक दिल्याने तो जागेवरच मृत्यू पावला. ट्रकचालक ट्रक सोडून पळून गेला. न्यायालयीन चौकशी अहवालामधे सदर मृत्यू ‘ऑनड्युटी” मान्य करून सरकारी कर्मचारी कुमार यांना मृत्यूनंतर मिळणारे फायदे व पेन्शन मिळणेकरिता अहवाल दाखल करणेत आला. मात्र, पेंशन व सुविधा विभागाने सदर मृत्यू सुट्टीवरून परत येताना झाला असल्याने तो ऑन ड्युटी मान्य करता येत नाही असे स्पष्ट केले त्यामुळे जवानाच्या पत्नीने उच्च न्यायालयात याचीका दाखल केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या “मदन सिंग शेखावत विरुद्ध युनिअन ऑफ इंडिया “ए आय आर एस सी या निकालात राजस्थान येथे सैन्य दलातील घोडास्वार रेल्वेतून उतरताना झालेल्या अपघातात नुकसानभरपाईबाबत स्पष्टीकरण केले होते, त्यामध्ये जरी एखाद्या जवानाला सुट्टी मंजूर झाली असली तरी जर त्याने संबंधित कार्यालयाच्या परवानगीशिवाय जर नोकरीचे ठिकाण सोडले तर ते अनधिकृत समजले जाईल. व त्या दरम्यान होणाऱ्या नुकसानभरपाईला संबंधित पेंशन विभाग जबाबदार नसेल. असा निकाल दिला गेला. त्याचप्रमाणे “युनियन ऑफ इंडिया व इतर विरुद्ध निवृत्त नाईक सुरेंद्र पांडे “या खटल्यात जवानाला दोन महिन्यांची सुट्टी मंजूर झाली व त्या सुट्टीसाठी हाजीपूरहून जम्मूला निघाला असताना प्रवासात त्याचा अपघात झाला व त्याला 20 टक्के अपंगत्व आले. न्यायालयीन चौकशीत तो सुट्टीवर असल्याने झालेल्या अपघातामुळे नुकसानभरपाईस नकार दिला गेला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याने जेथून प्रवासाला सुरुवात केली ते जिथपर्यंत प्रवास असेल तो सर्व कालावधी ग्राह्य धरून संबंधित जवान नुकसानभरपाईस पात्र आहे असा निकाल दिला. या सर्व निकालांचा संदर्भ देत या खटल्यात सुट्टीवरून कामावर रुजु होण्यासाठी निघालेला सहायक पोलीस उपनिरीक्षक राकेश कुमार हा परवानगीनेच सुट्टीवर गेला होता. त्यामुळे या जवानाचा झालेला अपघात हा “ऑन ड्युटी’ ग्राह्य धरून त्याच्या कुटुबीयांना पेन्शनसह सर्व सुविधा देण्याचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. एकूणच सैन्य दलातील सर्वच जवानांना दिलासा देणारा हा निर्णय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)